
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हयातील सुप्रसिध्द धान संशोधक तथा एचएमटी या वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. खोब्रागडे यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दादाजी खोब्रागडे हे मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले होते.
खोब्रागडे यांनी एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू हे नऊ तांदळाचे वाण विकसित केले.
खोब्रागडे यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. खोब्रागडे यांच्या निधनाने कृषी प्रगतीसाठी झटणारा एक प्रामाणिक संशोधक हरपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘खोब्रागडे यांनी संशोधित केलेल्या धान वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन धान शेतीत गुणात्मक सुधार झाला आहे. खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने मातीशी इमान राखणारे आणि तिचे ऋण फेडणारे संशोधक होते. राज्याचे कृषी क्षेत्र त्यांच्या योगदानाप्रती सदैव कृतज्ञ राहिल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.



























































