रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सर्पदंश झालेल्या बलिकेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

सर्पदंश झालेल्या बलिकेवर उपचारासाठी खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका बालिकेला जीव गमवावा लागला आहे. वरवडे येथील आर्या प्रफुल्ल जाधव (१०) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. ती वरवडे येथील रहिवासी होती. या घटनेमुळे वरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

मुंबई तेथे राहणारी आर्या जाधव ही आपल्या आई वडिलांसोबत वरवडे येथील आपल्या गावी आली होती. रविवारी सायंकाळी ती घराशेजारी खेळत असताना अचानक तिला सर्पदंश झाला. मुलीने आरडाओरडा केल्याने नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील आर्याला तातडीने खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने आर्यावर प्राथमिक उपचार झाले नाहीत. नातेवाईकानीं तिला त्याच अवस्थेत मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले.तेथील डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकानी आर्याला जिल्हा रुग्णालयात रात्री दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच आर्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आर्याच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप माजी जि. प. सभापती शरद बोरकर यांनी केला आहे.