आपण खरे पर्यावरणप्रेमी आहोत का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ravindra-gadgil>>रवींद्र वासुदेव गाडगीळ

“नेमेची येतो पावसाळा” अशी म्हण आहे, त्यानुसार आपण दरवर्षी ह्याच दिवशी पर्यावरणाची केवळ आठवण काढून मोकळे होतो, जमेल तसे संकल्पही करतो, पण त्या संकल्पांचा पाठपुरावा करत नाही, हे विदारक सत्य आहे. अगदी घोषणाही करतो. ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’, ‘हरित भरीत सृष्टी’,’सुजलाम सुफलाम हिंदुस्तान’,’वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘झाडे लावा झाडे जगवा’, इत्यादि अनेक उत्साहवर्धक घोष, पण आरंभशूर, ‘पुढे पाठ आणि मागे सपाट’. त्यासाठी कृती करावी लागते,हेच आम्ही विसरून गेलो आहोत. आतातर आमचेजवळ कितीतरी अफाट विज्ञान व तंत्रज्ञान आहे, उपकरणी,अवजारे आहेत, भूमी आहे, निसर्ग साथ देतो आहे. पण पहिले पाऊल टाकेल कोण?

त्यासाठी शास्त्रशुद्ध ज्ञान,प्रत्यक्ष सेवा देणारे स्वयंसेवकांचे संघटन, परस्पर सहकार्य, प्रबळ नेतृत्व, प्रचार प्रसार माध्यमांचे सहाय्य, पुरेसे आर्थिक बळ, स्थानिक जनतेचा सहभाग. हे सर्व घटक जर एकत्र आले तर स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. “योजकस्य तत्र दुर्लभ:” “ गाव करेल ते राव काय करेल”, कारण सर्वच बाबतीत शासनावर अवलंबून राहण्याची वाईट सवय लागलीय आपल्याला.

‘केल्याने देशाटन, पर्यटन’ समृद्ध ज्ञान मिळते. विशाल दृष्टीकोण होतो. मन जुळतात,फुलतात,माणसे कळतात,निसर्ग कळतो, इतिहास भूगोल नागरिकशास्त्राचा जवळून प्रात्यक्षिकासह अभ्यास होतो. सामाजिकशास्त्र,अर्थशास्त्र, मांनववंशशास्त्र,वातावरण,पर्यावरण,इत्यादि अनेक गोष्टी कळतात. आपल्या संत महात्म्यांनी त्यावर स्वानुभवाने लिहिले, ते प्रत्यक्ष फिरून मनन,चिंतन,लेखन करून मग प्रकटले. नुसते सांगून मोकळे झाले नाहीत तर प्रत्यक्ष जगले. ‘जे जे उत्तम,उदात्त,उन्नत’ ते ते त्यांनी दाखवलेच परंतु जीवनातील संभाव्य खाचखळगे, धोके दाखवून सावधही केले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे” झाडांना, वृक्ष वेलींना आपले सोयरे माना व तसे त्यांना ट्रीट करा तर ते तुम्हाला तुमच्या आयुष्यभर पुरेल एवढे सगळ्या गोष्टी देतील. म्हणजेच नुसतेच वृक्ष लावू नका त्याचे आपल्या नात्याप्रमाणे संवर्धन करा हाच संदेश ते देतात. “लेकुरे उदंड झाली” हा अभंग संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्या सातशे वर्षापूर्वीच, लोकसंख्येचा स्फोट होऊन दारिद्र्य येईल देशाला आणि माणसाला हे सावध करून अभंगाद्वारे सांगून ठेवले होते. किती ही दूरदृष्टी. पण लक्षात कोण घेतो?

संत ज्ञानेश्वर, संत समर्थ रामदास, संत एकनाथ, संत नामदेव, लो. टिळक, म.गांधी,संत विनोबा, हे पूर्ण देशभर फिरले, पूर्ण सत्य परिस्थिति जाणून घेतली, म्हणून ह्या संत लोकांचे विचार हे नेहमीच “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति” अशीच राहिली व “ हे विश्वची माझे घर” असे सर्वव्यापी संसाराचे चित्र त्यांनी नेहमी बघितले. अन्न, वस्त्र, निवारा (अवनि) तसेच आहार, निद्रा, भय, मैथुन या शिवाय मानवाला जगण्यासाठी बरेच काही लागते. त्यापैकि अत्यावश्यक गोष्ट म्हणजे एक पर्यावरण. तेही शुद्ध,पवित्र,शांत,सत्य,सुंदर. त्यात अंतर्भूत असलेली पंचमहाभूते पृथ्वी, जल, आकाश, वायु, अग्नि. ती सदा निर्मळ शुद्ध,पवित्र हवीत. आहेत का? नाही. आपण सर्व गलीच्छ, प्रदूषित करून ठेवली आहेत. होती का? हो. होती. तीर्थयात्रा,जत्रा,उत्सव,पर्यटन,सहल ह्या अशा अनेक कारणांनी निसर्गाशी संबंध होता. होतील का? हो. होतील ना. अगदी मनापासून प्रामाणिकपणे जर प्रयत्न केले तर नक्कीच होतील. आता सुवर्ण चतुष्कोण नदीजोड प्रकल्प सुरू आहेच ना. पण त्यालाही अडथळे येतातच की. पण, सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.

आज दुर्देवाने आज तेच नेमके नाही आहे. बाकी सर्व भौतिक सुखे हात जोडून नम्रतेने आपणासमोर आपल्या सेवेसाठी उभी आहेत. बरोबर विज्ञान,संशोधन,तंत्र,यंत्र दिमतीला आहेतच. मानव प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक पाऊल प्रगतीकडे टाकत आहे. परंतु ती प्रगति की अधोगती असा प्रश्न पडेल अशी दोन पावले मागे त्याची पडत आहेत. ह्याच विचार चक्रात तो अडकला आहे. कारण त्याची मंनःशांती पुर्णपणे ढळली आहे. तिच्या शोधात तो जगभर फिरत आहे. ती मिळण्यासाठी तो वाट्टेल ते करण्यास तय्यार आहे. जगायची उमेद, प्रसन्नता, समाधान, मनाची एकाग्रता,उत्साह,ऊर्जा,सुख,सर्वकाही तो हरवून बसला आहे. अन तो जे मार्ग निवडतो आहे ते भ्रमनिरास करणारे आहेत. “करायला जातोय गणपति होतो आहे मारुति” अशी बिकट अवस्था होत आहे त्याची. शेवटी “ब्रह्म सत्यम जगन मिथ्या” असे म्हणण्याची पाळी त्यावर आली आहे. प्रतिसृष्टी निर्माण करणारा मानव अखेर दुबळा ठरतोय. का कारण “ कुर्‍हाडीचा दांडा गोतास काल” स्वतःच्या कर्माने.

वातावरण, पर्यावरण, हवा, अन्नधान्य,पाणी ,भू जमीन, वृक्षवल्ली, आकाश, हे सर्व मूलभूत घटक प्रदूषित करत चालला आहे. याचा संपूर्ण नाश करावयाचा ध्यास जणू त्याने विकासाच्या नावाखाली घेतला आहे. एकही सार्वजनिक क्षेत्र त्याने सोडलेले नाही. नद्या, जंगले, डोंगर, दऱ्या, बस स्टँड, स्टेशन्स, एअर पोर्ट्स,बंदरे, कार्यालये, न्यायालये, शाळा, कोलेजेस, संस्था, स्थाने, पर्यटन केंद्रे ई. हे सर्व घडते आहे. त्याला कारण, प्रचंड सतत वाढती लोकसंख्या, अशिक्षितपणा, अज्ञान, आळस, वैचारिक गोंधळ, संघटितपणाचा दुरुपयोग, अरेरावी, अनेक प्रकारचे भेद, असुरक्षितता, अराजकता, बेकायदेशीर वागणे,कर्तव्यचूत,सहकार्‍याचा अभाव. त्यामुळे तो आतून भयभीत झाला आहे. आणि अस्वस्थही. काय करावे यासाठी चिंतातुरही. मग यावर उपाय नाहीत काय? आहेत ना? निसर्गाशी जवळीक साधून एकरूपता, सान्निध्य वाढविणे. “देव बोलतो बाल मुखातून, देव बोलतो उंघ पिकातून” हा आवाज ऐकण्याचे मनोबल, इच्छा, ताकद, सामर्थ्य मानवाने वाढवले पाहिजे. अहिंसात्मक प्रवृत्ती वाढवली पाहिजे. मुंगीपासून हत्तीपर्यंत आम्ही कुणाला पोसत नाही,हे कळले तरी पुरे. कि यातल्या एकाही जीवाला आम्ही जिवदा न देऊ शकत नाही, मग कोणत्या अहंकाराने आपण त्याची हिंसा घडवतो? “जगा व जगू द्या” हा खरा मंत्र आहे. “फुलपाखराच्या पंखांचे स्पंदन ऐकू येणे” ही जरा अतिशयोक्ति वाटली तरी “पिन ड्रॉप सायलेन्स” म्हणतात अन जे आपल्याला फार आवडते ते हेच. एवढे निसर्गाशी एकरूप होणे.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती” हे मन प्रसन्न करणारे अभंग आपल्या खूप परिचयाचे आहे, पण त्याचा आस्वाद घ्यायला वेळ कुठे आहे, अन जरी असला तरी त्याचे महत्व आम्हाला अजूनही समजलेले नाहीच. ओझोन,ओझोन कमी झाला म्हणून केवळ ओरडण्यात आम्ही आमचा आवाज सामील करीत आहोत, पण आपण तो “ तेणे सुखे रुचे, एकांताचा वास, रमे तेथे मन, क्रीडा करी” असे झोन कधी निर्माण करणार?

आपले धर्मकार्य त्यावरच अवलंबून आहे. आपल्या पुजा, पाठ, कर्मकांड, यज्ञयाग, दानधर्म, सर्व निसर्गाशी नाते जोडणारे आहेत. वर्षभराचे व जिवनभराचे पंचाग,दिनदर्शिका निसर्गाला सामावून घेणारी आहे. त्यासाठी लागणारे सर्व अहिंसात्मक साहित्य निसर्गाकडून मिळेल ते, त्यावरच निगडीत आहे. एवढेच नव्हे तर, हजारो वर्षापासून आपले सण, वार, उत्सव, संस्कार, संस्कृती निसर्ग नियम पाळून ऋतुचक्राप्रमाणे संबंधित आहेत. केवढी ही दूरदृष्टी व कार्यक्षमता तत्कालीन ऋषीमुनींची. वृक्षवेलीची जवळीक ही मानसिक सुख व आरोग्य देणारी. मनाला, डोळ्यांना नेहमी हिरवळ (ग्रीनरी) देणारी उत्साहवर्धक, मानवाच्या प्रत्येक कार्यात उपयोगी पडणारी ही वृक्षवल्ली अथ पासून इतिपर्यन्त कामास येणारी. मग तिचे पोषण व संवर्धन व्हायला नको का? म्हणून संत म्हणतात की त्यांच्यावर आपल्या सगेसोयर्‍यांप्रमाणे प्रेम करा.

सागरतीरांवर (चौपाटी,बंदरे) फिरायला जातो तेंव्हा त्याचे विशालपण नजरेत भरते, किंवा उंच हिमालय,डोंगर,पर्वत बघितले की खरेच त्यांची विशालता बघून मन भरून येते. आपला सर्व अहंकार गळून पडतो आणि आपले सूक्ष्मत्व जाणवते आणि नकळत आपण नम्र होतो. वार्‍याची झुळूक,मंद मंद वारा,सोसाट्याचा वारा,वादळ,यांचाही अनुभव सुखदायकच. झरा, नदी नाले, कालवे ,तलाव, पाट, केनल्स, विहिरी, खळाळते धबधबे, बघीतले की ते सुद्धा मानवाला काहीतरी शिकवत असतात. पक्षांची किलबिल,प्राण्यांचे विविध आवाज,कीटकांची किरकिर हे निसर्ग संगीत मानवाच्या सुखासाठीच निर्माण झालेले आहे. गम्मत म्हणजे यात आपल्याला काहीच करावे लागत नाही, उलट हिंसात्मक क्रिया करून मानव निसर्गाचा समतोल बिघडवून टाकतो. उलट कानोसा देऊन ऐकलात तर, एकांतात ‘शब्देविण संवादू’ साधता येईल. हो! हयाचीहि आपणास खूप गरज आहे. आपण रोज कोणाशीतरी काहीतरी बोलतोच पण स्वत:शी संवाद कधी साधतो का हो आपण?

विज्ञान,तंत्रज्ञान,यंत्रज्ञानाचा गरजेपुरता उपयोग न राहता अनावश्यक वाढ झाल्याने अशांतता, प्रदूषण, भेसळ, फसवाफसवि, लबाडी, कमालीचा स्वार्थीपणा,गोंगाट, आप्पलपोटेपणा, आळस, बेफिकिरी, अकार्यक्षमता, तुच्छता, अहंकार, गर्व, एकटेपणा वाढीस लागला आहे, कारण “ज्याच्या हाती ससा तो पारधी” ही अवस्था झाली आहे, माणुसकीचा बळी देऊन. “जिसकी लाठी ऊसकी भैंस” अशा वृत्तीमुळे “ माझे ते माझे,तुझे ही माझे” ही धारणा वाढीस लागून “ मी व माझे” यासाठी ते व्यक्ति, कुटुंब, समाज, गाव, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, केंद्र, राष्ट्र, खंड, विश्व अशा चढत्या भाजणीने साम्राज्यवादाकडे मानव वेगाने चालू लागला आहे. परस्पर सहकार्य हा मंत्र जणू विसरत चालला आहे. मग त्यासाठी कितीही हिंसा,तोडमोड,नाश झाला तरी चालेल.

नाही पण त्यावर मात करत प्रत्येक मानवी जीवाला निसर्गाचे रक्षण करायचे आहे. शपथपूर्वक ते कार्य हाती घेऊन वास्तवात उतरवायचे आहे. आणि नेहमी संदेश देण्याचा आवेश आणण्यापेक्षा आपण बाबा आमटे, सुधा मूर्ति, डॉ.बंग दाम्पत्य, यांसारखे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्यक्षात ते करू या, अन्यथा निसर्ग आपणाला कोणालाही माफ करणार नाही. पत्र, पुष्प, फल, तोयम यापैकी काहीही, कोणीही, कोणालाही, कितीही प्रेमपूर्वक द्या, म्हणजे ते मला मिळेल एवढे आश्वासक वचन भगवंताने, त्या नियंत्याने आपणास दिले आहे, ते प्रत्यक्षात आणू या. साधूया ‘मनामनाशी शब्देविण संवादू’, ‘आपुलाशी वाद आपणसी’ संवाद साधू निसर्गाशी’.