
योगेश पाटील । वसमत
शहरातील नांदेड -परभणी रस्त्यावर असलेल्या हिरो होन्डा शोरुमच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संभाजीनगर आगाराची एम.एच. २० बी.एल. ३५९९ या क्रमांकाची बस निजामाबाद येथून संभाजीनगरकडे जात होती. वसमत शहरातील हिरो होन्डा शोरुमच्या बाजुला असलेल्या रस्त्यावर एसटी बसचा आणि एम.एच. २६ क्यु २७५ या मोटारसायकलमध्ये टक्कर झाली. एसटी बसच्या धडकेत मोटारसायकल बाजुला फेकली गेली. या अपघातामध्ये वसमत शहराच्या कौठा रस्त्यावरील आंबेडकर नगर भागातील खंडोजी मदन इंगोले (२२), संजय उत्तम कांबळे (२३) हे दोन जण जागीच ठार झाले. तर गौतमनगर भागातील सुनील सखाराम खरे (२५) यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेत नांदेडला घेऊन जात असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.



























































