शिवसैनिकांना शाबासकीची थाप देण्यासाठी उद्धव ठाकरे आज तलासरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पालघर

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी शिवसेनेवर प्रचंड विश्वास दाखवून २ लाख ४३ हजार २१० मतांचे भरभरून दान दिले. या निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांना शाबासकीची थाप देण्यासाठी आणि पालघरच्या मतदारांचे खास आभार मानण्यासाठी आज गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डहाणू येथे येणार आहेत. शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारीही केली आहे.

पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा साम-दाम-दंड, ईव्हीएम घोटाळा, टक्केवारीचा झोल आणि बेफाम पैसे वाटप याला शिवसेनेने जोरदार टक्कर दिली. पालघरच्या निवडणुकीत शिवसेना पहिल्यांदाच उतरली आणि तब्बल २ लाख ४३ हजार २१० इतकी दुसऱया क्रमांकाची मते मिळवत मुसंडी मारली. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा अवघ्या २९ हजार मतांनी पराभव झाला, परंतु पालघरच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक लढलेल्या शिवसेनेला स्वबळावर अडीच लाखांच्या आसपास मिळालेली मते हा शिवसेनेचा विजयच मानायला हवा, अशी प्रतिक्रिया अवघ्या देशभरातून उमटली.

वनगा कुटुंबीयांची भेट घेणार
पालघरच्या जनतेने दाखवलेल्या बुलंद विश्वासाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी ३ वाजता डहाणूतील कवाडा येथे येणार आहेत. तेथे ते वनगा कुटुंबाची भेट घेऊन नंतर मतदारांशी संवाद साधतील. यावेळी शिवसेना नेते, ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.