२०१९ च्या तयारीला लागा… पालघरचा पुढचा खासदार श्रीनिवास वनगाच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वाणगाव

पालघरच्या पोटनिवडणुकीत अत्यंत कमी वेळेत शिवसेनेने जबरदस्त टक्कर दिली. ईव्हीएम घोटाळा आणि साम-दाम-दंड-भेद वापरून भाजपने ही निवडणूक जिंकली असली तरी हा शिवसेनेचा पराभव आहे हे मानायला मी तयार नाही. पिक्चर अभी बाकी है. आतापासूनच २०१९ च्या तयारीला लागा असे सांगतानाच पालघरचा पुढचा खासदार हे श्रीनिवास वनगाच असतील असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तलासरी येथील सभेत जाहीर केले तेव्हा उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ‘शिवसेना झिंदाबाद’,‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर केला.

पालघरच्या लोकसभा निवडणुकीनंतर श्रीनिवास वनगा यांना मातोश्रीचे दरवाजे बंद होतील अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी आज तलासरी येथे जाऊन वनगा कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आता हा मतदारसंघ सोडणार नाही. आता आकाशपाताळ एक करू पण पुढील निवडणुकीत इथून दिल्लीत खासदार म्हणून जातील ते श्रीनिवास वनगाच असा प्रचंड विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला अडीच लाख इतका भरभरून मतांचा कौल देणाऱया पालघरवासीयांना मानाचा मुजरा केला आणि लोकसभेची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदा लढवूनही अवघ्या पंधरा दिवसांत कडवी झुंज देणाऱया बहाद्दर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

सहा लाखांचे मतदान भाजपच्या विरोधात
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ही निवडणूक निष्ठावान शिवसैनिक विरुद्ध साम-दाम-दंड-भेद अशी झाली आणि शिवसेनाप्रमुखांवर, वनगा साहेबांवर निष्ठा असणाऱया बहाद्दर निष्ठावान शिवसैनिक व मतदारांनी साम-दाम-दंड-भेदवाल्यांना घाम फोडला. मागच्या निवडणुकीत चिंतामणराव वनगा यांना पाच लाखांच्यावर मते मिळाली होती आणि या निवडणुकीत तब्बल सहा लाख मते भाजपच्या विरोधात आहेत. मग कोण जिंकलं ते सांगा…

गावीत सांगा, बुलेट ट्रेन, बडोदा एक्सप्रेस वे, वाढवण बंदराचे काय करणार?
निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये असलेले राजेंद्र गावीत यांच्या घोषणांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर याला विरोध करताना आधीच्या पक्षात असताना शब्दांचे बुडबुडे सोडले होते. आता तुम्ही निवडणूक जिंकला आहात. तुम्ही जे बोलला होतात ते पूर्ण करा. व्यासपीठावर या. श्रीनिवासलाही बोलवा आणि त्या भाजपच्या खासदारालाही बोलवा. सांगा बुलेट ट्रेनला तुमचा पाठिंबा आहे की विरोध, वाढवण बंदराला तुमचा पाठिंबा आहे की विरोध, बडोदा एक्सप्रेस वेला तुमचा पाठिंबा आहे की विरोध… होऊन जाऊ दे आमने-सामने. तुम्ही जे बोलला होतात ते पूर्ण करा. आठ-नऊ महिनेच राहिलेत, कारण पुढचा खासदार आमचाच आहे.

यावेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अमित घोडा, उपनेत्या मीना कांबळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे, श्रीनिवास यांच्या मातोश्री जयश्री वनगा, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम, महिला जिल्हा संपर्क संघटक ममता चेंबूरकर, सहसंपर्कप्रमुख केतनकाका पाटील, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, बोईसर विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश धोडी, नीलम संखे, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, डहाणू-बोईसर जिल्हा संपर्क संघटक दीपा पाटील, ज्योती ठाकरे, तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, तालुकाप्रमुख संतोष वझे, उपतालुकाप्रमुख गिरीश राऊत, शहरप्रमुख संजय कांबळे, जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी रहाणे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आदिवासी, शेतकरी, शहरातले नोकरदार त्यांच्या वेळा सांभाळून मतदानाला येतात. त्यांना तुम्ही मतदानाचा अधिकार नाकारता? का तर यंत्र बंद पडली म्हणून? मग काळोख झाला की मतदानाचा आकडा कसा फुगतो? कुणी फुगवला? कोणाच्या सांगण्यावरून फुगवला? मतदान फुगवण्यासाठी तुम्ही त्यांना परवानगी कशी दिली?

बडगाच बाटगा झाला आहे!
उद्धव ठाकरे यांनी सत्तााधारी भाजपला शरण गेलेल्या निवडणूक यंत्रणेचा समाचार घेतला. ते म्हणाले, एकीकडे लोकशाहीत मतदान वाढले पाहिजे म्हणून होर्डिंग्ज लावायचे आणि प्रत्यक्ष जेव्हा मतदानाचा दिवस उजाडतो तेव्हा अस्सल असलेली नावंच्या नावं गायब होतात. हजारो बोगस मतदार घुसतात. मतदान यंत्रेही बंद पाडली आणि कारण उन्हाचं सांगितलं. मग चाचण्या कसल्या घेतल्या? ज्या देशात तुम्ही मतदान घेता त्या देशाचं हवामान तुम्हाला माहीत नाही? नावं गायब, बोगस मतदान, यंत्रं बिघडली यालाच लोकशाही म्हणतात? निवडणूक आयोगात शेंदूर फासलेले दगडधेंडे बसवले आहेत काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ज्याने डहाणूत पैसे वाटले त्या भाजपवाल्यांवर अजून कारवाई नाही. भाजपच्या जिंकलेल्या उमेदवाराला तो डोक्यावर घेऊन नाचताना चॅनलवर दिसतो इतकी निवडणूक यंत्रणा बटीक झाली आहे? म्हणे निवडणूक आयोग कडक आहे. तुम्ही जरा काही केलं की तुमच्या डोक्यावर बडगा मारू. मग त्यांच्या डोक्यावर का मारला नाही? कारण तुमचा बडगाच बाटगा झाला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

बुलेट ट्रेनविरोधात ठराव करा – डॉ. नीलम गोऱ्हे
बुलेट ट्रेन ही फक्त गुजरातमधील हिरे व्यापाऱयांसाठीच असून तिचा पालघरमधील लोकांना काहीच उपयोग नाही. येथील २२१ हेक्टर जमीन या बुलेट ट्रेनसाठी ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव असून त्याविरोधात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ठराव करावा असे आवाहन शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात केले . त्या म्हणाल्या की, बुलेट ट्रेनसह पाणी, वीज, बेरोजगारी या विषयावर शिवसेना विधिमंडळ, लोकसभेत आवाज उठवणार असून पालघरमधील आदिवासींना न्याय मिळवून देणारच. ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. याबाबत कोर्टात जाण्याची तयारी शिवसेनेने केली असून जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्या निलंबनाचीही मागणी केली असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

ठाण्याप्रमाणेच पालघरचा विकास करणार – एकनाथ शिंदे
निवडणुका झाल्या की काही पक्षांचे नेते दुसऱया निवडणुकीच्या तयारीसाठी निघून जातात, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन त्या शहरातील किंवा गावातील समस्या जाणून घेतात आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन देखील करतात. ते जिथे जातात त्या गावाचा विकास हमखास होतो. उद्धव ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष लक्ष असते. म्हणूनच ठाण्याचा विकास झाला. ठाण्याप्रमाणेच पालघरचाही विकास शिवसेना करेल अशी ग्वाही शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आपल्या भाषणात ते म्हणाले की, पालघरची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच लढवली आणि घराघरात धनुष्यबाण गेला. काही जणांना शिवसेना स्पर्धेतच नाही असे वाटत होते. पण प्रचाराचा धडाका बघून त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली. विरोधकांना तर घाम फुटला. दहा दिवसांत अडीच लाख मते मिळाली. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार असून ठाण्याप्रमाणे आम्ही पालघरचाही विकास करणारच असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जनता तिथे शिवसेना हीच शिवसेनेची भूमिका
‘जनता तिथे शिवसेना’ हीच शिवसेनेची भूमिका आहे. गरीबांकडून हिसकावणाऱया हातावर शिवसेना वार करणारच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. विकास कुणाला नको, पण आयुष्य बरबाद करून वरवंटा फिरवणारा विकास आम्हाला कदापि मंजूर नाही. एखादा प्रकल्प जनतेला हवा की नको हे विचारायचं नाही आणि थेट जनसुनावणी… ही जनसुनावणी खरंच होते का सांगा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी कमळाबाईला घटस्फोट दिलाय… श्रीनिवास वनगा
आमच्या बाबांनी कमळाबाईबरोबर संसार केला.. पण कमळाबाई विचित्र वागायला लागली म्हणून आता मी तिला घटस्फोट दिलाय अशी जबरदस्त टोलेबाजी श्रीनिवास वनगा यांनी केली. ते पुढे म्हणाले, आता काही दिवस गेल्यानंतर कमळाबाई मला पुन्हा पटवायला लागली आहे. पण आता तिच्यासोबत संसार करणे शक्य नाही असे वनगा यांनी सांगताच प्रचंड हंशा उसळला. मला धमक्याही येतात. पण मी त्यांना घाबरत नाही. पालघरची पोटनिवडणूक ही सहामाही परीक्षा होती. ती बी ग्रेडने पास झालो.. आता आठ-नऊ महिन्यांवर फायनल परीक्षा आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर ती ए ग्रेडने मी पास होईन. पिक्चर अभी बाकी है.. आणि हा पिक्चर चांगला रिलीज होऊन पालघरवर शिवसेनेचा भगवाच फडकेल, असा विश्वास श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला.

फटकारे
– जर का पोटनिवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरून एवढे सगळे चाळे करून तुम्हाला निसटता विजय मिळत असेल तर मी म्हणतो हा तुमचा विजय नाही. हा तुमचा दारुण पराभव आहे. आणि तो माझ्या एका साध्या सैनिकाने, एका आदिवासी मुलाने केला आहे.

– श्रीनिवास… आपल्याला फक्त पंधरा दिवस मिळाले. त्या पंधरा दिवसांत अडीच लाख मतांची मजल गाठली. आता तुला आठ-नऊ महिने मिळाले आहेत. शांत बसू नकोस. हा सगळा तमाम शिवसैनिक, पालघरची जनता तुझ्या सोबत आहे. गरज असेल तिथे मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. आता खासदार झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. शिवसैनिकांनो, घराघरात जा. धनुष्यबाण पोहचवा. २०१९ च्या निवडणुकीत श्रीनिवास खासदार झालाच पाहिजे.