आगामी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पाडणारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार रावसाहेब दानवे यांना पैसा आणि सत्तेची मस्ती आली आहे. आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी फक्त लोकांना फसवण्याचेच काम केले आहे. त्यामुळेच लोक त्यांना ‘चकवा’ म्हणतात. दानवे यांची ही सत्तेची मस्ती लोकसभा निवडणुकीत उतरवणार, त्यांना या निवडणुकीत पाडणारच! अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघात केला.

बुधवारी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर आज जालना येथे पत्रकारांशी बोलताना खोतकर यांनी दानवे यांच्यावर जोरदार पलटवार केला. वरिष्ठांचा विश्वास नसल्यानेच त्यांना मातोश्रीवर बैठकीसाठी येऊ दिले नसावे. रावसाहेब दानवे त्या बैठकीच्या पात्रतेचे नाहीत,किंवा बैठकीत होणाऱ्या चर्चेची गुप्तता ते पाळत नाहीत अशी शंका आल्यामुळे भाजपच्या नेतृत्वानेच त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले असावे, असा टोला अर्जुन खोतकर यांनी लगावला.

जिल्ह्यातील प्रशासन रावसाहेब दानवे यांनी अक्षरश: वेठीला धरले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार हे दानवेंच्या मनमानीला वैतागले आहेत. जिल्ह्याचे प्रशासन दानवेंच्या दबावाखाली काम करत आहे. ते अधिकाऱ्यांना चार-चार तास बाहेर उभे करतात. त्यांना घरगड्यासारखी वागणूक देतात, असा आरोपही खोतकरांनी केला. जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामांचे हजारो कोटींचे ठेके दानवे कुटुंबाकडेच आहेत. त्यांचे व्याही, जावई, भाऊ सगळेच ठेकेदारी करत असून ते करत असलेल्या कामांचा दर्जा तपासून पाहावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. केवळ शिवसेनेने केलेल्या मदतीमुळेच रावसाहेब दानवे हे आजपर्यंत चार वेळा लोकसभेवर निवडून गेले. मात्र यावेळी दानवेंना पाडणार, असा आत्मविश्वास खोतकर यांनी बोलून दाखवला.