
अभय मिरजकर, लातूर
अनेक वर्षात झाला नाही असा पाऊस लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. निलंगा शहरात काही नागरी भागात कमरे इतके पाणी साठले होते. नद्या भरुन वाहिल्या आहेत. तळे भरले आहेत. रस्ते, पुलाचा भराव वाहून गेला आहे. विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी बंद आहे.
लातूर जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, यावर्षी माञ पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक वर्षात असा पाऊस पावसाळ्याच्या प्रारंभी झालेला नव्हता. औसा तालुक्यातील सर्व मंडळात अतिवृष्टी झाली. निलंगा तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. औसा मंडळात १०४ मि.मी. बेलकुंड ९६, भादा ७०, किल्लारी ७०, किनीथोट ८२, लामजना १२५, मातोळा ८३ मि.मी. पाऊस झाला. निलंगा तालूक्यातील निलंगा मंडळात १२९ मि.मी. मदनसूरी १५४, कासारबालकुंदा ९०, अंबुलगा(बु) ६५, निटूर ७७, पानचिंचोली मंडळात १४२ मि.मी. पाऊस झाला आहे.






























































