हाफिज फुत्कारला; मोदींना ठार मारून हिंदुस्थानचे तुकडे करू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रावळकोट

मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदने हिंदुस्थानविरोधात फुत्कार काढले आहेत. जमात-उद-दावा या आपल्या दहशतवादी संघटनेमार्फत रमजानच्या महिन्यात जिहाद करण्यासाठी तो तरुणांना फूस लावत असल्याचं समोर आलं आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारून हिंदुस्थानावर इस्लामचा झेंडा फडकवण्याची धमकी त्याने दिली आहे.

जमात-उद-दावाशी संबंधित दहशतवादी मौलाना बशीर अहमद खाकी याच्या माध्यमातून हाफिज सईदने ही धमकी दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, रमजानचा महिना जिहादसाठी अतिशय योग्य असतो. या महिन्यात जिहाद करतेवेळी जे लोक शहीद होतात, त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे नेहमीच खुले राहतील. जमात उद दावाचे अनुयायी कश्मीरमध्ये जिहाद सुरू ठेवत आहेत आणि हिंदुस्थानी सैनिकांशी लढत आहेत, असं खाकी यावेळी म्हणाला.

हिंदुस्थानच्या बरबादीसाठी हा जिहाद सुरू असून त्यात अधिकाधिक तरुणांनी सहभाग घ्यावा, असं आवाहनही खाकीने केलं आहे. इस्लामचा झेंडा लवकरच हिंदुस्थान आणि पाकिस्तामध्ये फडकणार. मोदी मारले जातील. हिंदुस्थान आणि इस्रायलचे छोटे-छोटे तुकडे केले जातील, असे फुत्कार स्वतःला हाफिज सईदचा संदेशवाहक म्हणवणाऱ्या खाकीने सोडले आहेत.