
सामना प्रतिनिधी । भोकर
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगार वाढीकरिता पुकारलेल्या बंदला अनोळखी इसमाकडून हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला असून, भोकर आणि हदगाव आगारांच्या दोन बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच पगारात वाढ केली असली तरी केलेली पगारवाढ आम्हास मान्य नसल्याचे सांगत शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बंद पुकारला या बंदमध्ये भोकर आगारातील अल्प प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले तर अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर राहिले. भोकरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा अनोळखी इसमाकडून प्रयत्न झाला. भोकर शहरातील साईबाबा पेट्रोल पंपाजवळ बस क्रमांक एमएच-२०-डी- ९८१७ या हदगाव आगाराच्या बसवर सकाळी ७ वाजता दगडफेक करून समोरील काच फोडण्यात आल्या तर भोकर आगाराची बस क्रमांक एमएच ०६एस-८७६३ या बसवर भोसी येथे सकाळी ८ वा. दगडफेक झाल्याने मागील काच फोडण्यात आल्या. या दोन्ही ठिकाणच्या घटनेत सुदैवाने कोणत्याच प्रवाशास ईजा झाली नसल्याची माहिती भोकर येथील आगारप्रमुख पी.एस.पावरा यांनी दिली. वाहकांच्या फिर्यादीवरून पोलिसात अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर आगारातून नियमित असलेल्या फेऱ्यापैकी दुपारी १२ वाजेपर्यंत ३७ पैकी ९ फेऱ्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे रद्द झाल्याची माहिती आगारातून देण्यात आली.

































































