
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडपाठोपाठ हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या अडचणीत सापडली आहे. गुप्तहेर व्यक्तिरेखांच्या संकल्पनेवर आधारित असलेली अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’च्या कथानकावर हिंदुस्थानी प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. या मालिकेमधून दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांमध्ये हिंदुस्थानी चेहऱ्यांना दहशतवादी दाखवण्यात आले होते. यामुळे सोशल मीडियावर मालिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी आता मालिकेची निर्मिती करणाऱ्या कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.
ABC नेटवर्कने दिलगिरी व्यक्त करत म्हटले आहे की, ‘मालिकेत दाखवण्यात आलेल्या हिंदू टेरर प्लॉटमुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रियांकाला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र ती अभिनेत्री असून तिने ही मालिका अथवा मालिकेचे कथानक लिहिलेले नाही. त्यामुळे या कथानकामुळे कळतनकळत प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही खेद व्यक्त करत आहोत.’
दरम्यान, १ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणूबॉम्बने हल्ला करण्याचा कट एक एमआयटी (MIT) प्राध्यापक रचत असल्याचे दाखवण्यात आले. हा दहशतवादी एक भारतीय असल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. पाकिस्तानवर दोष देऊन भारतीय दहशतवादी परिषदेवर हल्ला करणार असल्याचे मालिकेचे कथानक होते.





























































