
सामना ऑनलाईन । प्रतापगड
उत्तरप्रदेशच्या प्रतापगडमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. संपत्तीसाठी एक मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम जियावन गौड (६८) असं मृत वडिलांचं नाव आपल्या कुटुंबीयांसोबत ढीढूई गावात राहत होते. त्यांचा मुलगा बालमुकुंद याला लागलेल्या वाईट संगतीमुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी त्याला अनेकदा सुधारण्याची संधीही दिली होती. मात्र बालमुकुंद सुधारला नाही.
शनिवारी रात्री राम आणि त्यांचा मुलगा बालमुकुंद यांच्यात काही कारणांमुळे जोरदार वाद झाला. यावेळी वडिलांनी त्याला त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे संपत्तीतून बेदखल करण्याची धमकी दिली. संपत्ती आपल्याला मिळणार नाही म्हणून संतापलेल्या बालमुकुंदने धारदार सुऱ्याने वडिलांवर हल्ला केला. तसेच त्यांना काठीने बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या हल्ल्यामुळे राम यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून वडिलांच्या हत्येनंतर बालमुकुंद फरार आहे. त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

























































