व्हिडीओ : पर्यटकांचे जीवघेणे धाडस, मालवण किनाऱ्यावर तिघे बालबाल बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित खोत । मालवण

भरतीच्या काळात समुद्र किनाऱ्यापासून लांब राहा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले तरी काही उत्साही लोकं किनाऱ्यावर जातात आणि नको ते जीवघेणे धाडस करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिउत्साही पर्यटकांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. मालवण रॉक गार्डन परिसरातील खडकाळ भागात सेल्फी घेत उसळणाऱ्या समुद्री लाटांचा आनंद लुटणारे तीन युवक लाटांचा तडाख्यातून बालबाल बचावले. तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मालवणात दमदार पाऊस पडत आहे. पावसामुळे समुद्रही खवळला आहे. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन परिसरात या लाटा अधिकच उसळत आहेत. अनेक पर्यटक व नागरिक या लाटांचा आनंद लुटतात. त्यात काही अतिउत्साही पर्यटकही असतात. याच स्वरूपातील काही अति उत्साही पर्यटक शनिवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले. रॉक गार्डन पार्कींग ठिकाणी कार पार्क करून हे युवक पोलीस वसाहत मागील खडकाळ परिसरात उसळणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होते. तर दगडांवर बसून सेल्फीही घेत होते.

हे दृश्य रॉक गार्डन व्यवस्थापक उमेश हर्डीकर यांनी पाहिले. त्या पर्यटकांना ओरडून सूचना केल्या. तर काहींनी पर्यटकांचा हा अतिउत्साही पणा मोबाईल कॅमेरात कैद केला. याचवेळी उसळलेली मोठी लाट पर्यटकांच्या अंगावर धडकली. यात हे पर्यटक दगडात फेकले गेले. त्याच वेळी शूटिंग करणारे पण त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले. सुदैवाने पर्यटक बचावले. त्यांना काही प्रमाणात किरकोळ जखमी झाले.