…आला पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी<<

[email protected]

हवामान खात्याने वर्तवलेले शुभवर्तमान खरे ठरले असेल तर एव्हाना पाऊस सुरू झालेला असेल, शेतकरी आनंदलेला असेल. शहरी भागातली काँक्रीटच्या जंगलांमधली कडक उन्हाची तलखी ओसरलेली असेल आणि वर आकाशात मेघांनी कृपाछत्र धरल्यामुळे शेतकऱ्याच्या डोईवर इरलं आणि इतरत्र रंगीबेरंगी छत्र्या उघडून पावसाचं स्वागत होत असेल.

ही ‘जर-तर’ची भाषा एवढय़ासाठीच की, निसर्गाचा काय हो भरवसा? ‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ अशी कविता ज्या काळात लिहिली गेली त्या काळात खरंच पाऊस नेमेचि यायचा. ७ जूनला मृग नक्षत्र लागलं की, महाराष्ट्रातला शेतकरी उत्साहाने पेरणीच्या कामाला लागायचा. क्वचित पाच-पंधरा वर्षांनी दुष्काळाचं सावट यायचं खरं, पण एकूण ऋतुचक्राला काही शिस्त होती. माणसाच्या व्यवहारासारखाच निसर्गही बिघडला, मनमानी करू लागला. वाढती लोकसंख्या, भूजलाचा बेसुमार उपसा, प्रचंड पाणी पिणारी पिकं अशा एक ना अनेक कारणांनी गेल्या काही वर्षांत दुष्काळाने थैमान घातलं आणि शेतकरी संकटात सापडला. बरं, अशा विपरीत परिस्थितीत काही पिकवावं तर त्याचा खर्च भरून निघेल इतकीही आमदनी  होईना. मग बळीराजाने करावं काय?

या सगळय़ावर खूप चर्चा होतेय. राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीने मांडणी करतायत, तज्ञ त्यांची मतं मांडतायत आणि ‘नाम’ किंवा ‘पाणी फाऊंडेशन’सारख्या संस्था लोकजागृती करून थेट प्रश्नाला भिडतायत. या सर्वांचा एकत्रित आणि चांगला परिणाम दिसला आणि अंदाजानुसार भरपूर पाऊस झाला तर पुढच्या वर्षापर्यंत जलसाठे तुडुंब राहतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

आकाशातून पडणाऱ्या पाण्याचा थेंब न् थेंब जरी पकडता आला नाही तरी त्यातलं बरंचसं पाणी साठवता आलं तर वर्षभर पुरेल एवढं पाणी नक्कीच मिळेल. हे करीत असताना काठोकाठ भरलेली धरणंसुद्धा उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच मोठय़ा प्रमाणावर का आटतायत याचा अभ्यास व्हायला हवा. साठवलेल्या पाण्याचीही ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे जलद गतीने वाफ होत असेल तर नवे उपाय शोधायला हवेत. एका तरुणाने आपल्या दुष्काळी गावातल्या घराच्या आवारात फेरो सिमेंटची टाकी बांधून पाणी साठवलं आणि पावसाळय़ानंतरच्या काळातच ते कसं वापरलं याची माहिती आली होती. असे छोटे-मोठे असंख्य हातांचे प्रयत्न यशस्वी झाले म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटेल. ‘वॉटर मॅनेजमेंट’ किंवा ‘जल नियोजन’ करणं आपल्या हाती आहे.

कृत्रिम पावसाचे प्रयोग फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत आणि नैसर्गिकरीत्या कोसळतो तसा धो धो पाऊस त्यातून शक्य नाही, पण जिथे भरपूर पाऊस पडतो तिथलं पाणी कमी पाण्याच्या क्षेत्रापर्यंत नळाने नेता येईल का? महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर कोकण हे पाण्याचं कोठार म्हणावं लागेल. किनारपट्टीवर भरपूर पाऊस पडतो. ते पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येईल. यावर तज्ञांनी मतं मांडायला हवीत. जिथे कमीत कमी पाऊस पडतो तो सगळा ‘साठवण्या’चे उपाय शोधून ते कार्यान्वित करायला हवेत. पीकपाण्याच्या प्रश्नावर सरकार, जनता, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था यांची एकत्रित फळी निर्माण झाली तर राज्य दुष्काळमुक्त जरूर होईल.

सध्या तरी सुखद गारव्याचे दिवस आले आहेत. आता हा ‘ऋतु हिरवा’ अधिकाधिक बहरत जाईल. ‘नभ उतरू आलं’ की, ना. धों. महानोरांसारखा निसर्गात रमणारा कवी नभाकडे ‘दान’ मागतो.

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि या मातीतुनी चैतन्य गावे

नभाने भरभरून ‘दान’ दिलं, मातीतून चैतन्य जागलं की, कवी सोपानदेव चौधरी म्हणतात त्याप्रमाणे

मेघांनी गेलं हो आभाळ भरून

हासत वरूनि बघतो वरुण… आणि

ओलावल्या आशा ओलावले मन

सुकेपणा गेला थबथबून

भिजली शिवारं, भिजली पठारं,

भिजल्या डोंगरदरी हो…

असं सारं हिरवाईचं लेणं सर्वत्र दिसू लागते. पावसातला महाराष्ट्र मोहवणारा असतो. कडेकपारीत धबधबे फुटत असतात. डोंगरमाथे हिरवी मखमली शाल पांघरतात. शंकरराव कानेटकर म्हणजेच कवी गिरीश यांनी या हिरवाईचं गुणगान गाताना शेतकऱ्याच्या मनातली वेदनाही नोंदवून ठेवलीय.

पाऊस बरसला, धरती तृप्त झाली. अवघी सृष्टी शांतवली. उद्याचं पीक शेतकऱ्याच्या नजरेत दिसू लागलं, पण एवढं होऊनही त्याची विवंचना संपते का? कवी म्हणतो,

पावसामुळे

निवली राने, गुरे–वासरे

निवली झाडे, रानपाखरे

धनी अंतरी निवले सारे

शेतकऱयांच्या पोटामधला

निवेल कधी पण जाळ?

कृषिवलाचं मन खऱ्या अर्थाने तृप्त होईल तेव्हा या पावसाचंही ईप्सित साध्य होईल. पाऊसपाण्याने शेतात परसलेलं समाधान कष्टकरी शेतकऱयांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होईल तो खरा सुगीचा काळ. ‘पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ, सोसाटय़ाचा वारा’ अशा या वातावरणात आपण बळीराजाच्या सौख्याची मनोकामना करूया.