
सामना प्रतिनिधी । खेड
खेड तालुक्यातील तब्बल १२ जिल्हा परिषद शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांना याही वर्षी जीव मुठीत धरून बसावे लागणार आहे. शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर करण्यात आले आहेत. परंतु लालफितीच्या कारभारामुळे हे प्रस्ताव तसेच धुळखात पडले असल्याने दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी प्राप्त झालेला नाही.
खेड तालुक्यात ३७३ शाळा आहेत. यापैकी अनेक इमारती अतिशय धोकादायक झालेल्या आहेत. गेल्या तीन चार वर्षांत काही शाळांच्या इमारती जमीनदोस्तही झालेल्या आहेत. काही शाळांच्या छपरावरील कौले उडाली आहेत तर काही शाळा कधी जमीनदोस्त होतील हे सांगता येणे कठीण आहे.
तालुक्यात ज्या शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत त्या इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी संबंधितांकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. जून महिन्यात शाळा सुरु होण्यापुर्वी शाळांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांकडूनही करण्यात आली आहे परंतु शाळांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक तो निधीच उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील १२ शाळांमधील विद्यार्थ्यांना यावर्षीही छपरातून येणारे पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर झेलत अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत.
तालुक्यातील आंबवली, धामणंद-पाथरेवाडी, पोयनार-पाटीलवाडी, जामगे-कदमवाडी क्रमांक १, भोस्ते क्र. १, भेलसई-गंगवाडी, आंबये-पाटीलवाडी, चिंचवली-शिंगरवाडी, कशेडी-खोतवाडी, बिजघर क्रमांक १, सवेणी, बहिरवली-कुणबीवाडी, पन्हाळजे-पाटीलवाडी या १२ शाळा नादुरुस्त आहेत.
पाऊस सुरू होण्यापुर्वी या शाळांची दुरुस्ती होणे आवश्यक होते, मात्र उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू व्हायला दोन दिवस उरले तरी शाळा दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल नसल्याने यंदाही या शाळांतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागणार आहे.



























































