
सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाटयगृह, मुलुंड
संगीत रंगभूमी ही जागतिक रंगभूमीला मिळालेली देणगी आहे असे आपण म्हणतो, मग याच रंगभूमीला अनुल्लेखाने का मारता? संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्ही बघितला, त्याचबरोबर नटांच्या मनमानीने संगीत नाटकं बिघडतानाही बघितली. संगीत रंगभूमीची ही अवकळा दूर होऊन पुन्हा एकदा नाटक उभं राहिलं पाहिजे, अशा आशावाद ९८ व्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केला.
नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतन करण्याची तसेच कृती करण्याची गरज व्यक्त केली. संगीत नाटकासाठी जे जे करता येईल ते करण्याची तयारी आहे. नवीन विचारांना सोबत घेऊन पुढे जाण्यास तयार आहोत, असे सांगत आपण संगीत रंगभूमीचे शिलेदार असल्याचे कीर्तीताईंनी दाखवून दिले. त्या म्हणाल्या, संगीत नाटकात आम्ही काम करत असलो तरी इतर रंगभूमीकडेही आम्ही रसिकतेने बघतो. ६० वर्षांत रंगभूमीवरील सर्व प्रवाह आम्ही जवळून बघितले. नाटय़वेडा महाराष्ट्र मला सतत खुणावत राहिला आणि आम्ही शिलेदार तिकडे ओढले गेलो. संगीत नाटक जिथे पोचले पाहिजे तिथे पोचवण्याचा वसा आम्ही घेतला. गावोगावी शिलेदारांची मराठी रंगभूमी पोचली. पण पुढे बेशिस्त गायक, नटनटय़ांच्या बेताल अदाकारीवरून अकारण संगीत रंगभूमीला वेठीला धरले आणि एका चांगल्या अभिजात कलाकलाप्रकाराला उतरती कळा लागली.
संमेलनाच्या अध्यक्षपदाने काहीशा भावुक झालेल्या कीर्तीताईंनी आई जयमाला शिलेदार यांचे स्मरण करीत त्यांच्याप्रमाणेच संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान दिल्याबद्दल रसिकांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, वारकऱयाला आषाढी एकादशीच्या दिवशी पूजेचा मान दिल्यावर त्याची जी अवस्था होते ती आज माझी झाली आहे. तुडुंब गर्दीत रंगमंचाच्या विठोबाचे दर्शन झाले आज. संगीत नाटक हे खेळणे आईवडिलांनी हातात ठेवले ते खेळणे मी आणि लता यांनी आयुष्यभर सांभाळले. अध्यक्षीय भाषणात संगीत रंगभूमीचा, तिथल्या शिस्तीचा त्यांनी आढावा घेतला.
संमेलनाच्या मांडवाखालून तेंडुलकर, दुबेंना जाता आले नाही सतीश आळेकर यांची खंत
नाटय़परिषदेने नाटय़संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावले तेव्हाच समजले की काहीतरी बदल झालाय. मात्र संमेलनाच्या मांडवाखालून विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे आणि श्रीराम लागू यांना जाता आले असते तर खूप आनंद झाला असता असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी उद्घाटनपर सोहळ्यात व्यक्त केले. सतीश आळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रंगभूमीला खऱया अर्थाने व्यावसायिक करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी परिषदेने एक चिंतन शिबीर घ्यावे, असे त्यांनी सुचवले.
मानाची पगडी आणि पदक
हजारो नाटय़प्रेमींच्या साक्षीने नाटय़संमेलनाचे मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांनी आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे कीर्ती शिलेदार यांच्याकडे सोपवली. संमेलनाच्या प्रथेनुसार सावरकर यांनी त्यांना पगडी घातली व मानाचे पदक दिले. यावेळी त्या भावुक झाल्या.



























































