नॉनस्टॉप नाट्यसंमेलनाची तिसरी घंटा वाजली, ६० तास रसिकांना खिळवून ठेवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड

तिसरी घंटा होताच ऑर्गनवर नांदीचे सूर वाजू लागले आणि मुलुंडच्या महाकवी कालिदास नाटय़मंदिराच्या आवारातील प्रियदर्शनी क्रीडा संकुलात आज नाटय़धारा बरसल्या. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी श्रीफळ वाढवून ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे उद्घाटन केले तेव्हा संकुलातील हजारो नाटय़प्रेमींनी टाळय़ांचा गजर केला. तब्बल २५ वर्षांनंतर मुंबईत प्रथमच ६० तास नाटय़संमेलनाचा श्रीगणेशा झाला असून या ऐतिहासिक उद्घाटन सोहळय़ासाठी प्रचंड गर्दी झाली होती. आकर्षक, भव्य असे रंगीबेरंगी व्यासपीठ, नाटय़ परंपरेला साजेसे नेपथ्य आणि नव्या-जुन्या कलाकारांचा अपूर्व संगम यानिमित्ताने झाला.

आज दुपारपासूनच रसिकांची पावले ऐतिहासिक नाटय़संमेलनाच्या दिशेने वळत होती. नाटय़मंदिराच्या आवारात भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह उभारण्यात आले होते. विद्युत रोषणाई तसेच भव्य व्यासपीठ यामुळे उद्घाटन सोहळय़ाची श्रीमंती आणखीनच वाढली. ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री फय्याज यांच्या सोबत नवोदित कलाकारांनी गायलेल्या नांदीने सारे वातावरण प्रसन्न झाले. व्यासपीठावर अध्यक्षा कीर्ती शिलेदार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नाटय़संमेलनाचे मावळते अध्यक्ष जयंत सावरकर, स्वागताध्यक्ष व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते.

२ महिने ६ दिवसांत तयारी

उद्घाटन सोहळय़ाचे प्रसाद ओक यांनी खुसखुशीत निवेदन केले. उल्हास सुर्वे यांनी व्यासपीठावर येऊन तिसरी घंटा वाजवली. केवळ २ महिने व ६ दिवसांत नाटय़संमेलनाची तयारी केली असल्याचे परिषदेचे प्रमुख कार्यवाह व अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले.

सई परांजपे, विजया मेहता, मोहन जोशी, प्रशांत दामले यांचा सत्कार

नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ास आवर्जून उपस्थित राहिलेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा विशेष सत्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सई परांजपे, विजया मेहता, प्रशांत दामले यांचाही नाटय़ परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला.