
सामना विशेष प्रतिनिधी । मुंबई
मुंबईहून पंचवीस मिनिटांत पुण्याला नेणाऱ्या स्वप्नवत हायपर लूपचा पंधरा किमी लांबीचा मार्ग पुण्यात तयार होत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हायपर लूपचे ट्रॅक टाकण्याची तयारी सुरू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत होते. यावेळी त्यांनी नेवाडा येथील हायपर लूप वन प्रकल्पाला भेट दिली. वर्जिन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालकीय मंडळाचे सदस्य रॉब लॉइड यांची भेट घेतली. मुंबई-पुणे हायपर लूप सुरू करण्यापूर्वी प्रकल्पाचा अधिक अभ्यास करण्यासाठी वर्जिन हायपर लूपचे इंजिनीयर लवकच पुण्यात येणार आहेत.
जागा निवडली
पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने हायपर लूपचा पंधरा किमीचा मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित केली आहे. या मार्गावर हायपर लूपचा ट्रॅक टाकण्यात येईल. हायपर लूपसाठी आवश्यक असलेले साहित्य व कच्चा माल महाराष्ट्रातच उपलब्ध होईल. साहित्य अमेरिकेतून आयात करण्याची गरज भासणार नाही.
प्रदूषणात घट
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे सध्या प्रदूषणात मोठी वाढ होताना दिसत आहे. हायपर लूपच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहतूककोंडी दूर होईलच, पण मोटारींच्या इंजिनमधून बाहेर पडणाऱया घातक धुराच्या उत्सर्जनात दरवर्षाला दीड लाख टनांनी घट होईल असे सांगण्यात येते.





























































