
सामना प्रतिनिधी । मुंबई
राष्ट्रीय पक्षांनी देशातील जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. अशा स्थितीत प्रादेशिक पक्षांना बळकटी देणे गरजेचे आहे आणि ते काम शिवसेना करत आहे. म्हणूनच देशभरातील प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीचे नेतृत्व शिवसेनेने अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करावे अशी विनंती आसाम गण परिषदेने केली आहे.
आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा आणि कार्याध्यक्ष केशव महांता यांच्यासह या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी रात्री ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय पक्षांच्या मुजोरीविरोधात शिवसेना ठामपणे उभी आहे. प्रादेशिक पक्षांची अस्मिता आणि स्वाभिमान टिकवण्याचे कार्य उद्धव ठाकरे करत असल्याबद्दल परिषदेने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी देशातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.
आसामातील संस्कृतीवर घाला घालण्याला केंद्राचा डाव
आसामातील बांगलादेशींच्या घुसखोरीविरोधात आसाम गण परिषदेचा लढा सुरूच आहे. या लढय़ात तब्बल 855 कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावले. परिषदेचा लढा तीक्र असला तरी केंद्र सरकारने नागरिकत्वाचा सुधारीत कायदा आणण्याचा घाट घातला आहे. हा कायदा संमत झाला तर बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आसामात आलेल्या घुसखोरांना नागरिकत्व बहाल करावे लागेल अशी भीती गण परिषदेच्या नेत्यांनी व्यक्त केली. या विधेयकामुळे आसामातील संस्कृती, अर्थव्यवस्था आणि भाषाही धोक्यात येईल. म्हणूनच केंद्र सरकारचा हा डाव उधळून लावण्यासाठी शिवसेनेने आमच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी परिषदेच्या नेत्यांनी यावेळी केली.

शिवसेना परिषदेच्या पाठीशी
आसाममधील भाषा आणि संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा डाव जर केंद्राने आखला असेल तर नागरिकत्वाच्या सुधारीत विधेयकाला शिवसेना संसदेत कडाडून विरोध करील असे ठामपणे सांगतानाच शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आसाम गण परिषदेला आश्वस्त केले. यावेळी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते.
गुवाहाटीत येण्याचे निमंत्रण
आसाम गण परिषदेने यावेळी उद्धव ठाकरे यांना गुवाहाटीला येण्याचे निमंत्रणही दिले. मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रात जे प्रयत्न करत आहे तेच प्रयत्न गण परिषद आसामात करत आहे. म्हणूनच परिषदेचे कार्यकर्ते आणि आसामी जनता यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटीत यावे असे निमंत्रण परिषदेच्या नेत्यांनी दिले.





























































