
सामना ऑनलाईन । बिजिंग
हॉटेल चालावं, खवय्यांची गर्दी आपल्याकडे खेचावी म्हणून चमचमीत, चविष्ट जेवणासोबतच वेगवेगळ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात येतं. पण चीनमधल्या हॉटेल मालकाला अशी ऑफर देणं चागलंच महागात पडलं आणि त्याला चक्क हॉटेल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
घरच्या जेवणाऐवजी हॉटेलात जाऊन खाणाऱ्या खवय्यांची संख्या वाढली आहे. त्यात ऑफर्स असतील अशा ठिकाणी खवय्ये आणि कमी खर्चात पार्ट्या उरकरणारे किंवा मग नित्यनेमानं बाहेरचंच भोजन घेणारे तर पहिले पोहोचतात. अशावेळी ऑफर दिली असली तरी हॉटेलवाल्याची मात्र चांदीच होत असते. मात्र चीनमधल्या एका हॉटेल मालकाला ऑफर देणं महागात पडलं. चीनमध्ये १ जून रोजी जियामेनेर यांनी आपलं हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलनं नेहमी येणाऱ्या खवय्यांसाठी धमाकेदार ऑफर दिली होती. त्यामुळं या हॉटेलात रोज किमान ५०० पेक्षा जास्त लोकांची गर्दी व्हायला लागली होती. २५ डॉलर्स भरून लॉयल्टी कार्ड घ्यायचं व महिन्याभरात हवं तेवढं खायचं अशी ऑफर या हॉटेलनं दिली होती. हॉटेलात नेहमी येणाऱ्या खवय्यांनी तर याचा पूरेपूर फायदा घेतला. पण या हॉटेलनं दिलेल्या लॉयल्टी कार्डावर त्यांच्या नातेवाईक-मित्र- मैत्रिणींनी देखील ताव मारला.
पंधरावड्यातच ग्राहकांनी या हॉटेलात भस्म्या झाल्यासारखं खाल्लं आणि हॉटेलवर चक्क १००,००० डॉलर्सचं कर्ज झालं. अखेर मालकानं हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, ‘आम्ही जरी कर्जात बुडालो असलो तरी, यातून पुन्हा एकदा नवा व्यवसाय उभारण्यासाठी याची मदत होईल’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




























































