
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
धर्मापूरी परिसरातील भोजनकवाडी – दौंडवाडी शिवारातील ‘बिबट्या दर्शनाने’ भोजनकवाडी – दौंडवाडी परिसरात नागरीकांचा जागर सुरू झाला आहे. भोजनकवाडी नंतर आता आज दि.२० रोजी दुपारी ११.३० च्या दरम्यान दौंडवाडी शिवारात एका शेतकऱ्याला बिबट्या आढळला. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वीच वनविभागाच्या पहाणीत आढळून आलेले आहे. आज पुन्हा एकदा ‘बिबट्या दर्शन’ झाल्याने वनविभागाचे पथक या परिसरात तळ ठोकून आहे.
परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळच्या भोजनकवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे दि. १७ रोजी निदर्शनास आले होते. शेतात काम करणाऱ्या एकावर हल्ला केला. या हल्ल्यात अंकुश वसंत केदार रा. भोजनकवाडी वय २३ वर्षे हा शेतकरी किरकोळ जखमी झालेला आहे. वनविभागाच्या वतीने याची शहानिशा करण्यात आली. या ठिकाणी बिबट्या चा वावर झाल्याच्या खुणा आढळून आल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. भोजनकवाडी गावाच्या आसपास डोंगर जमीन आहे. तसेच परिसरात दौंडवाडी शिवारातील डोंगर परिक्षेत्र व काही प्रमाणात झुडपी वनक्षेत्र आहे.
आपल्या शिवारात वाघ असल्याची चर्चा गावात व परिसरात पसरली. या मुळे नागरिकांत भीती निर्माण झाली. शिवारात बिबट्या फिरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे भोजनकवाडी – दौंडवाडी परिसरात नागरीक दिवसरात्र दहशतीखाली आहेत. शेतात जायला भीती वाटत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तसेच सध्या पेरणीचे दिवस असून ही कामे ठप्प झाली आहेत.































































