ठाण्यात दोन एसटींची धडक, २३ प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

सॅटीस पुलाच्या उतारावर आज दुपारी दोन एसटी बसेसची टक्कर होऊन २७ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यातील काही प्रवाशांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसचा ब्रेक व्यवस्थित न लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यात चालकही जखमी झाला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मोठी दुर्घटना टळली. अन्यथा अनर्थ झाला असता.

सॅटीस पुलाच्या जांभळी नाका भागातील उतारावर ठाण्याहून शहापूरकडे जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ती रस्त्याच्या बाजुला उभी होती. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ठाणे-भिवंडी बसने या बसला जोरदार धडक दिली. भिवंडी बसचा चालक एस.बी. गीते याचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे उभ्या असलेल्या शहापूर बसवर आदळली. क्षणभर काय झाले हे प्रवाशांना कळलेच नाही. त्यामुळे एकच आरडाओरडा सुरू झाला. या दुर्घटनेत बसचा चालक गीते याच्यासह प्रवासी जखमी झाले.

चौकशीचे आदेश

ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या बसमध्ये गर्दी होती. या बसचा चालक गीते याने समोर उभी असलेली बस लक्षात घेऊन अचानकपणे ब्रेक दाबला. पण तो पूर्णपणे न लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही बसेसची टक्कर झाली. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रुग्णालयात गर्दी

thane-st1

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अपघाताची माहिती समजताच एसटीचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रवाशांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून अनेक प्रवाशांच्या डोक्याला, पायाला तसेच हाताला मार बसला आहे.

‘त्या’ बसची तपासणी केली होती का?

ठाण्याच्या डेपोतून निघणाऱया प्रत्येक बसेसची तांत्रिकदृष्टय़ा तपासणी केली जाते. मात्र शहापूरकडे जाणाऱया बसची तांत्रिक तपासणी केली होती तर बसचे स्टेअरिंग लॉक कसे झाले असा सवाल संतप्त प्रवाशांनी विचारला.

अरूंद सॅटीस

अरूंद सॅटीस पुलावरून परिवहनच्या बसेस तसेच एसटीच्या बसेस रोज जात असतात. ठाण्याहून बोरिवली, भाईंदर, भिवंडी, नालोसापारा तसेच अन्य ठिकाणी एसटीच्या बसेस जातात. मात्र हा मार्ग अत्यंत अरूंद असल्याने एखाद्या बसचे ब्रेक डाऊन झाले तर मागील सर्व बसेस ताटकळत उभ्या राहतात. बसची दुरुस्ती होईपर्यंत रस्त्यावर लांबच लांब रांग लागते.