
>> विवेक दिगंबर वैद्य
महान राष्ट्रसंत श्रीपाचलेगांवकर महाराजांच्या अनोख्या चरित्रगाथेचा हा उत्कट परिचय.
एखादी व्यक्ती संतपदास पोहोचणे हे केवळ दैवी संकेतामुळेच होते असे नाही, त्याचप्रमाणे साधू, सिद्धपुरुषादी तत्त्वे प्राप्त करण्यासाठी जपजाप्य, व्रतअनुष्ठान, कर्मकांडे, तपसाधना करण्याची आवश्यकता असतेच असे नाही हे जणू अपवादाने सिद्ध करण्यासाठी राष्ट्रसंत श्रीपाचलेगांवकर महाराज यांनी देहावतार धारण केला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
श्रीपाचलेगांवकर महाराज बुद्धिनिष्ठ होते. त्यांचे धगधगते वैराग्य, असामान्य वक्तृत्व, धर्मकार्याविषयीची ‘प्रबोधनात्मक’ दृष्टी, धर्मजागृतीसाठी केलेला त्याग अन् ‘खऱया’ धर्माचे आकलन करून देण्यासाठी समाजामध्ये सर्वदूर, सर्वत्र केलेला मुक्त संचार (म्हणून त्यांना ‘संचारेश्वर’ म्हटले जात असे) यांमुळे त्यांच्यातील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवत असे. त्यासोबतच महाराजांच्या अवतीभवती असणारे सापांचे वलयदेखील त्यांचा लौकिक सर्वदूर पसरविण्यास कारणीभूत ठरले. गळ्यात सर्प घेऊन हिंडणारे ‘संचारेश्वर’ कुठल्याही प्रकारच्या सर्पाला ज्या सहजतेने हाताळत त्यास पाहून कित्येकजण आश्चर्यचकित होत असत.
आपल्या हयातीतच दंतकथा किंवा आख्यायिका बनून राहिलेल्या श्रीपाचलेगांवकर महाराजांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१२ रोजी परभणी जिह्यातील पाचलेगांव येथे झाला. निजामाच्या आमदानीत २१ गावांची वतनदारी सांभाळणाऱया, आश्वलायन शाखेच्या कौशिक गोत्रातील राजारामपंत कुलकर्णी या सद्गृहस्थाच्या घरी ऐन दिवाळीत नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या या बालकाचे नाव ‘नरसिंह’ असे ठेवण्यात आले. श्रीदत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीनारायण दत्तानंद सरस्वती हे राजारामपंत आणि कृष्णाई यांच्या पोटी जन्म घेणार असल्याचे भाकीत श्रीमाधवाश्रम स्वामी यांनी ‘नरसिंह’ बालकाच्या जन्माआधीच वर्तवले होते.
कुलकर्ण्यांच्या घरी शुभशकुनाची चाहूल घेऊन आलेल्या या बाळाच्या नामकरणासाठी श्रीमाधवाश्रमस्वामी निघाले, परंतु त्याआधीच घरातील काही वृद्ध मंडळींनी मागच्या पिढीतील पूर्वज ‘नरसिंह’ यांचे नाव बाळासाठी सुचविले. नामकरण सोहळा पार पडला, मात्र त्यानंतर तेथे पोहोचलेल्या श्रीमाधवाश्रमस्वामींनी बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याचे नामकरण ‘संचारेश्वर’ असे केले. इतकेच नाही तर हे बालक पुढे जाऊन देशभरात संचार करेल आणि आपले ‘संचारेश्वर’ हे नाव खरे ठरवेल असेही भाकीत वर्तवले.
बालवयातील नरसिंहाचे वर्तन अतिशय हूड होते. नदीनाल्यांमधून बेदरकारपणे पोहणे त्यास प्रिय होते. विहिरीत उडी टाकल्यावर थेट पाण्याचा तळ गाठून नरसिंह काठावर बसलेल्या मुलांच्या तोंडाला फेस आणत असे. एकदा काही मित्रांसोबत शेजारच्या गावात गेलेल्या नरसिंहाने तिथल्या एका दारूच्या गुत्त्यावर चाल करून दारूची मडकी फोडली. त्याचे हे कृत्य पाहून गावकरी सुखावले असले तरी दारूचा धंदा सांभाळणारा पठाण खवळला. नरसिंहाचा माग काढीत पाचलेगांवात येऊन पोहोचला. त्या पठाणाच्या समोर धीटाईने उभे राहत नरसिंहाने त्याला दारूचे दुष्परिणाम सांगून त्याची कानउघाडणी केली शिवाय त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. नरसिंहाचे म्हणणे रास्त असल्याने तो पठाण तोंडातून चकार शब्द न काढता तेथून काढता पाय घेता झाला.
पाचलेगांवात दसऱयाच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याची प्रथा होती. वर्षानुवर्षे चाललेली ही प्रथा नरसिंहाने मोडीत काढली. बोकडाच्या मानेवरून सुरी फिरवण्याचा अवकाश, नरसिंह स्वतः बोकडाच्या मानेवर आपली मान ठेवून प्रतिकार करता झाला. या कृतीतून लहानग्या नरसिंहाने जणू ग्रामस्थांच्या डोळ्यात अंजन घातले. याचे फलित म्हणून गावातील पशूवधाची अनिष्ट प्रथा बंद झाली.
नरसिंहाचे सखेसोबती विविध जातीधर्माचे होते. त्या साऱयांना नरसिंह आपल्या घरी आणत असे आणि जेऊखाऊ घालत असे तसेच स्वतः ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला नरसिंह गावातील कोणत्याही जातीधर्मातील लोकांच्या घरी जाऊन खातपीत असे. गावातील स्पृश्य-अस्पृश्याच्या सर्व संकल्पना नरसिंहाने मोडीत काढल्या होत्या आणि त्यावेळी या बाल समाजसुधारकाचे वय अवघे सहा वर्षांचे होते.
नरसिंहाचे नाव गावच्या शाळेत घालण्यात आले. नित्यनेमाने शाळेची पायरी चढणारा नरसिंह अभ्यासात मात्र फारसा रमला नाही. शाळेतही दांडगाई, खेळ व मस्ती हे चालू होतेच शिवाय वर्गातील मुलांना घेऊन तो माळावर जात असे आणि तेथे शिवपिंड स्थापन करून पूजाअर्चा करण्यात मग्न होत असे. पुढे तर नरसिंहामधील विरक्तीच्या छटा सर्वांना प्रकर्षाने जाणवू लागल्या. नित्य भस्म लावून बसणाऱया नरसिंहास कधी अंगावर वस्त्र नसल्याचेही भान राहत नसे. डोक्यावरचे केस जटा होण्याइतपत वाढले होते. घरी नित्यनेमाने येणाऱया न्हाव्यास त्याने कधी आपल्या केसांना वस्तरा लावू दिला नाही. आठव्या वर्षीच नरसिंह व्रतस्थ योग्याप्रमाणे दिसू लागला.
दरम्यान, श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी, नरसिंहाच्या घरी आणि अन्यत्र सर्व स्त्राrवर्गाची नागपूजनाची लगबग होती. वाडय़ातील स्त्रियांनी मातीचा नाग तयार करून त्याचे प्रतिमा पूजन करण्याचे ठरविले तेव्हा नरसिंह निरागसपणे त्यांना विचारता झाला, ‘तुम्ही नागाची प्रतिमा पूजण्याऐवजी खरा नाग का पूजत नाही?’ महिलावर्गाने नरसिंहाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही या कारणाने नरसिंह बाहेर निघाला आणि थेट माळावर जाऊन त्याने जिवंत नाग धरून आणला.
नरसिंहाचे बोलणे हसण्यावारी नेणाऱया त्या महिलांनी जेव्हा त्याच्या कोवळ्या हातात पिवळाधमक सळसळणारा नाग पाहिला तेव्हा त्यांची गाळण उडाली. कृष्णाईंवर तर बेशुद्ध होण्याची पाळी आली, मात्र नरसिंहाने सर्वांना धीर दिला आणि त्यांना नागाची पूजा करण्यास सांगितले. अखेर नरसिंहाच्या सामर्थ्यावर विश्वास असणाऱया त्या स्त्रियांनी धीर एकवटून खऱयाखुऱया नागराजाची पूजा करीत नागपंचमी साजरी केली. पुढे ही गोष्ट गावातच नव्हे तर पंचक्रोशीतही पसरली आणि नरसिंह सर्वत्र चर्चेचा विषय बनला.
दरम्यान, गावामध्ये श्रीमाधवाश्रम स्वामी यांचे आगमन झाले. गुरूशिष्यांची भेट पहिल्या प्रथमच घडत होती. स्वामीजींना समोर पाहून नरसिंहाचे चित्त सैरभैर झाले. श्रीमाधवाश्रम स्वामींनी नरसिंहाच्या कानांत बीजमंत्र दिला आणि राजारामपंत-कृष्णाईस येणाऱया काळाविषयीचे भाकीत वर्तवून तसेच आश्वस्तही करून स्वामी निघून गेले. स्वामीजींच्या भेटीनंतर नरसिंहाच्या चित्तवृत्तीत बदल घडता झाला, आधीच विरक्त झालेले त्याचे मन गृहत्यागाच्या निर्णयाप्रत आले आणि प्रपंचापासून दूर जाण्याचा विचार करू लागले. (क्रमशः)




























































