एका हातात साप व दुसऱ्या हाताला सलाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहरातील एक २७ वर्षाचा तरूण साप चावला म्हणून स्वत: चालत जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप त्याच्या हातात असल्याचे पाहून सुरूवातील डॉक्टर व नर्स घाबरल्या. मात्र त्या तरूणाला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ त्या तरूणावर उपचार सुरू केले. लखन गायकवाड (रा. काळा हनुमान ठाणा, बीड) असे साप चावलेल्या धाडसी तरूणाचे नाव आहे.

एका हातात साप व दुसऱ्या हाताला सलाईन असे चित्र पहायला मिळाले. त्या तरूणाच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच वेळी सर्प मित्र व पोलिस असलेले अमित मगर यांना फोन करून बोलावून घेतले. बीड जिल्हा रूग्णालयात अपघात कक्षात लखन यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्प मित्र मगर हे रूग्णालयात आल्यानंतर त्या तरूणाच्या हातातून साप काढून घेण्यात आला. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेवून उपचार घेतला.
साप दिसताक्षणी मारून टाकला जातो. मात्र लखन गायकवाड यांनी साप चावल्यानंतर त्याला पकडून जिल्हा रूग्णालयात आणले. सर्प मित्राच्या मदतीने त्या सापाला एका बंद भरणीत ठेवण्यात आले. लखन गायकवाड यांच्यावर आता उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठिक आहे. याशिवाय सापाला देखील सर्प मित्रामुळे जीवदान मिळाले आहे.