
सामना प्रतिनिधी । मालवण
पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार संजय मोरे यांना कोकण पट्ट्यातील सर्वच जिल्ह्यात पदवीधर मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. हा पाठिंबा मतपेटीतून स्पष्ट होत मोरे पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
पदवीधर मतदारांच्या भेटीगाठी घेत मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार नाईक यांनी संजय मोरे यांच्या विजयाची खात्री असल्याचे सांगितले.
कोकण पदवीधर मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी वराडकर हायस्कुल कट्टा येथे शिक्षकांची भेट घेऊन संजय मोरे यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षक पदवीधर मतदारांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या. तसेच पदवीधरांचे प्रश्न, शिक्षकांच्या भविष्यातील अडचणी सोडविण्यासाठी संजय मोरे हे सक्षम उमेदवार आहेत. त्यांना पहिल्या पसंतीचं मत द्या असे संबोधित केले. यावेळी महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबूलकर, शिवा भोजने आदी उपस्थित होते.
अतिवृष्टी नुकसान भरपाईत वाढ करण्याची मागणी
सिंधुदुर्गात जी तुफान अतिवृष्टी झाली त्यात मोठी हानी झाली. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे. शासनाच्या वतीने मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असून त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत शासन स्तरावर लवकरच बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ असे सांगितले.































































