
सामना प्रतिनिधी । मुंबई
पायरेटेड वेबसाइटमुळे चित्रपट निर्मात्यांचे करोडो रुपयांचे नुसकान होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज सुमारे ३० लाख लोक या वेबसाइटच्या माध्यमातून चित्रपट पाहतात. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप जातात. अशा सुमारे २९पायरेटेड वेबसाइट महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने बंद केल्या.
हिंदुस्थानमध्ये चित्रपट क्षेत्रात दरवर्षी सुमारे दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. यातून सुमारे 95 हजार कोटी रुपयांचा कर विविध माध्यमातून सरकारी दरबारी जमा होतो, परंतु हिंदुस्थानात सुमारे ८ कोटी ८५ लाख ६०हजार लोक पायरेटेड वेबसाइटवरून नवीन चित्रपट तसेच मालिकांचा आनंद घेतात. यामुळे निर्मात्यांना फटका बसतोच, पण त्याचबरोबर सरकारी नुकसानही होते. याबद्दल वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने ऑगस्ट २०१७ पासूनच्या २९ पायरेटेड वेबसाइट बंद केल्या आहेत.
सर्वाधिक पसंतीची वेबसाइटही बंद
महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने ज्या २९ वेबसाइट बंद केल्या त्यातील ‘कुछ रंग ऐसे भी प्यार के डॉट नेट’ ही वेबसाइट सर्वाधिक पसंतीची आहे. या वेबसाइटवर दर महिना सुमारे दोन कोटी लोक चित्रपट तसेच मालिका पाहतात. ‘बद तमीज दिल डॉट नेट’ ही वेबसाइट दुसऱया क्रमांकावर असून १ कोटी ७५ लाख लोक या वेबसाइटचा वापर करतात. ‘तू आशिकी डॉट कॉम’ या वेबसाइटवर १ कोटी ३६ लाख लोक महिन्याला पायरेटेड चित्रपट पाहतात.

























































