अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला पाच महिन्यांनी जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कमला मिल अग्नितांडव प्रकरणात दोषी ठरलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. कमला मिल आगीप्रकरणी गुन्हा दाखल असलेले अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांना ४५ हजारांच्या जातमुचलक्यावर हायकोर्टाने जामिन मंजूर केला. पाटील यांना २० जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. या आगीप्रकरणी वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रोच्या मालकांसह १४ जणांना अटक करण्यात आली. वन अबव्ह या रेस्टो पबला फायर सेफ्टी प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांना याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. जामीन मिळावा म्हणून पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. परंतु सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पाटील यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी वन अबव्हच्या मालकाने आपण फायर सेफ्टी प्रमाणपत्र दिल्यानंतर अंतर्गत रचनेत बदल केल्याचा युक्तिवाद पाटील यांच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत हायकोर्टाने पाटील यांना जामीन मंजूर केला.