
सामना प्रतिनिधी, हडपसर
व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्याने प्रेमभंग झाल्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन आपल्या राहत्या घरी फॅनला नायलॉनची दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने पंधरा पानांचे पत्र लिहिले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील अमनोरा पार्क येथे घडली.
अक्षय अखिलेशवर कुमार (वय २२, रा. टॉवर न.२५, अमनोरा पार्क) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा आंध्र प्रदेश विशाखापट्टणमचा रहिवासी होता. अक्षय आयबिएस कॉलेज, मगरपट्टा येथील व्यवस्थापन शास्त्र विषय शिकत होता. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल पंधरा पानांचे पत्र लिहून त्यांच्या खोलीमधील फ्रिजवर ठेवले होते. त्याचे एका मुलीवर गेले आठ महिन्यांपासून प्रेम होते. ते एकमेकांना भेटत असत. मात्र, गेले तीन महिन्यांपासून ती मुलगी भेटण्यास नकार देत होती. त्या दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. प्रेमभंग झाल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. गेला महिनाभर तो कॉलेजलाही जाण्याचे टाळत होता. त्याच्या खोलीच्या बाहेर तो पडत नव्हता. गुरुवारी दिवसभर त्याच्या काही मित्रांनी त्याला फोन केले. मात्र, त्याने फोन न घेतल्यामुळे त्याचे मित्र त्याच्या रूममध्ये त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने दरवाजा उघडला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पंधरा पानांच्या पत्रामध्ये त्याने आत्महत्या करीत असल्याबद्दल आपल्या आई, वडील व भावाला उद्देशून वारंवार माफी मागितलेली आहे. तसेच मित्रांना उद्देशूनही माफी मागितलेली आहे. पत्रामध्ये त्याने प्रेमाची सुरुवात ते शेवटपर्यंत सर्व नमूद केलेले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे.

























































