कांदिवली येथे नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कांदिवलीच्या समतानगरमध्ये राहणाऱ्या हर्षिका मायावंती (१४) हिने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हर्षिका नववीत शिकत होती. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हर्षिका आईवडील आणि लहान बहिणीसह ठाकूर व्हिलेज येथील गार्डेनिया टॉवरमध्ये राहत होती. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजारील ऑर्केड बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर गेली. हा मजला मोकळा असल्याने यावर कोणी राहत नव्हते. मोकळय़ा जागेतून ती गॅलरीत उतरली त्यावेळी कॉलनीतील इतर इमारतीमध्ये राहणाऱ्या काही रहिवाशांनी आरडाओरड करून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच तिने उडी मारली.

समतानगर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तिला जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी अगर अन्य काही लिहिल्याचे मिळाले नसल्याचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले. हर्षिका कांदिवलीमधील गुंडेचा एज्युकेशन इन्स्टिटय़ूटमध्ये नववीत शिकत होती. तिचे वडील इन्शुरन्स कंपनीत नोकरी करीत असून आई गृहिणी आहे. हर्षिका हिने या वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास समतानगर पोलीस करीत आहेत. कुटुंबीयांसह तिचे मित्र आणि मैत्रिणींची याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.