
सामना ऑनलाईन । मुंबई
देशातील सध्याचे वातावरण ‘आणीबाणी’ नंतरच्या इंदिरा गांधी यांच्या राजवटीसारखेच आहे. त्यावेळच्या निवडणुकीत त्यांना ‘पर्याय’ म्हणून वा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणाचेही नाव विरोधी पक्षांकडून जाहीर केले गेले नव्हते. पण इंदिरा गांधींच्या पराभवानंतर मोरारजी देसाई हे विजयी पक्षांचा ‘चेहरा’ बनले होते. पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तसेच घडू शकते, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना ते म्हणाले की, चर्चेत नसलेला माणूसही देशाचा पुढचा पंतप्रधान बनू शकतो.
लोकसभा निवडणुकीसाठी ‘तिसरी आघाडी’ निर्माण होण्याची शक्यता अजिबात नाही असे स्पष्ट शब्दांत सांगून पवार म्हणाले की, तिसरी आघाडी व्यवहार्यच नाही. त्यामुळे ती साकार होईल असे मला तरी वाटत नाही.
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीआधी तर काँग्रेसच्या म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात मैदानात कोणताही पक्ष नव्हता. पण निवडणुकीत मात्र कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेने एकवटून मतदान केले आणि काँग्रेसचा पराभव झाला होता, असे त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधी यांचा पराभव करणारे सारे पक्ष निवडणुकीनंतर एकत्र झाले होते आणि त्यांनी मोरारजी देसाई यांच्या रूपाने आपला नेता निवडला होता याची आठवण करून देत पवार पुढे म्हणाले की, तो इतिहास पाहता आजघडीला शरद पवार वा अन्य कोणाचेही नाव पंतप्रधानपदाचा ‘चेहरा’ म्हणून घोषित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.



























































