मुंबईतील ४४५ पुलांचे आजपासून स्ट्रक्चरल ऑडिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रेल्वे पुलांची जबाबदारी झटकता येणार नाही म्हणून बुधवारी शिवसेनेने अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर गुरुवारी लगेचच पालिका प्रशासन कामाला लागले आहे. रेल्वे आणि पालिका यांच्यात समन्वय साधण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पुढाकार घेतला असून पालिका मुख्यालयात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबईतील सर्व ४४५ पादचारी, वाहतूक पूल आणि स्कायवॉकचे आजपासूनच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर आणि एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या उड्डाणपुलांचा आणि रेल्वे पुलांचाही प्रश्न ऐरणीवर आला. पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची शिवसेनेने अनेकदा मागणी केली, मात्र प्रशासनाचा ऑडिट अहवाल कधीच बाहेर आला नाही. काल झालेल्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा अधिकाऱयांचे कान टोचले. इमारती धोकादायक ठरवण्यात घाई करणारे अधिकारी पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत मात्र चालढकल का करतात असा सवालही स्थायी समिती अध्यक्षांनी विचारला. त्यानंतर आज पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित होते. या बैठकीत महानगरपालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्यादरम्यान अधिक प्रभावी समन्वय साधण्याच्या दृष्टीने विविध मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त रमेश पवार, महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे संचालक विनोद चिठोरे, पूल खात्याचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी हे देखील उपस्थित होते.

टिळक पूल आणि एल्फिन्स्टन पुलाला प्रायोरिटी
कालच्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी रेल्वेच्या हद्दीतील दुरवस्था झालेल्या पुलांचा पाढाच वाचला. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दादरमधील टिळक ब्रिज आणि एल्फिन्स्टन पूल कधीही कोसळतील अशा अवस्थेत असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आजच्या बैठकीत या पुलांना प्रायोरिटी देण्याचे ठरले. संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत त्यांची संरचनात्मक तपासणी अगोदर करण्याचे ठरले.

४४५ पुलांची तपासणी : १२ पथके तयार
मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी, एफओबी, स्कायवॉक इत्यादी प्रकारचे ४४५ पूल आहेत. या पुलांची संरचनात्मक तपासणी उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. यासाठी एकूण १२ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये आयआयटी मुंबईचे तज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्याही तज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे.

४० वर्षांवरील पुलांचे आधी सेफ्टी ऑडिट
मध्य रेल्वेने ४० वर्षांपेक्षा जादा आयुर्मान झालेल्या रेल्वे मार्गावरील सर्व प्रकारच्या बांधकामांचे सर्वात आधी सेफ्टी ऑडिट करण्याची सूचना केली असून दादरचा टिळक ब्रिज तसेच एल्फिन्स्टन ब्रिजचे सर्वात आधी सेफ्टी ऑडिट करण्याची सूचना मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी या बैठकीत केली आहे. या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता आणि दोन्ही विभागांचे इंजिनीअर्स आणि पूल खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

३० कोटींचा फंड जमा करण्याची सूचना
पुलांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींचा तातडीचा फंड जमा करण्याची सूचना पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱयांना केली आहे. त्यावर पालिका अधिकाऱयांनी यावर विचार करण्यात येईल, परंतु स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय नेऊन मंजूर करावा लागेल, असेही स्पष्ट केले. तीन ते चार महिन्यांत हे ऑडिट संपणार असून त्यानंतर कोणता पूल पाडायचा ते निश्चित होणार आहे. पश्चिम रेल्वेने काही उड्डाणपुलांच्या शेजारीच पादचाऱयांसाठी तयार केलेल्या वाटेवरून बेकायदेशीरपणे दुचाकींची वाहतूक केली जाते तिच्यावर बंदी घालण्यासाठी बॅरिकेडस् टाकण्याची सूचना पालिकेला केली आहे. या संयुक्त पाहणी समितीची पहिली बैठक येत्या १० जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील विभागीय व्यवस्थापकांच्या कार्यालयात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दर महिन्याला होणार संयुक्त बैठक
महापालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्यामध्ये अधिक चांगले समन्वयन नियमितपणे साधले जावे या उद्देशाने आता यापुढे दर महिन्याला ठरावीक दिवशी नियमितपणे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अभियंता व संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित राहतील आणि महापालिका व रेल्वेच्या यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयन साधण्याच्या दृष्टीने कार्यवाही करतील, असेही या बैठकीत ठरले.