ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत गैरप्रकार, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठात ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीचा अहवाल सरकारला अजून मिळालेला नाही असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले. शिवसेना आमदार सुनील राऊत व इतर सदस्यांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची अनियमितता कायम असून प्रलंबित निकालांमुळे विधी अभ्यासक्रमाची परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली तसेच विधी विभागातील पदव्युत्तर पदवीच्या सात बहुपयोगी प्रश्न उत्तरासह छापल्याची चूक कबूल करणाऱ्या पेपर सेटरवर विद्यापीठाने कोणताही कारवाई केली नसल्याबद्दल राऊत यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर निकाल उशिरा लागल्याने नापास विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरता यावेत यासाठी प्रलंबित निकालांमुळे विधी अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलण्यात येते. तसेच प्रश्नांसह उत्तरे छापणाऱ्या पेपर सेटरला सक्त ताकीद दिल्याचे लेखी उत्तरात नमूद करीत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकावर कारवाई करून परीक्षेचे निकाल वेळेत लावण्यासंदर्भात विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी सरकारकडे आल्याचे लेखी उत्तरात मान्य केले आहे.