
सामना ऑनलाईन । मुंबई
‘लेथ जोशी’ असे हटके नाव असलेल्या चित्रपटाचे प्रमोशनल गाणे नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. ‘एक मशीन बाहेर आणि एक मशीन आत, आत आणि बाहेर नुसताच खडखटाट….’ अशा ओळी असलेलं गाणं जरा वेगळेच आहे. माणसाचं जगणं आणि मशीन यांच्यातलं नातं हे गाणे नेमकेपणाने अधोरेखित करते. वैभव जोशी यांनी लिहिलेलं गीत नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. जयदीप वैद्य या नव्या दमाच्या गायकानं हे गाणे गायले आहे. साधेसोपे शब्द, उत्तम चित्रीकरण आणि गुणगुणावीशी वाटणारी चाल ही गाण्याची वैशिष्टय़े आहेत.
अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने ‘लेथ जोशी’ हा चित्रपट प्रस्तुत केला असून प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘लेथ जोशी’ हा चित्रपट येत्या १३ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.




























































