श्रीयशवंतराव महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘मामलेदार’ पदावर कार्यरत असलेल्या श्री यशवंतराव भोसेकर नामक ‘देव’तुल्य सत्पुरुषाचा परिचय करून देणारा लेख.

संतमांदियाळीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संतमंडळी त्यांच्या आराध्य दैवताचे अर्थात विठूमाऊलीचे अपार प्रेम मिळवती झाली अन् त्यांना लाभलेल्या या प्रेमाचा झरा समाजासाठी खुल्या दिलाने निःसंकोचपणे रिता करती झाली. सोलापूर जिह्यातील पंढरपूर नगरीमध्ये दस्तुरखुद्द विठोबारखुमाई अवघ्या महाराष्ट्रभूमीचा कैवार घेण्यासाठी सज्ज असताना त्यांचीच भूमिका पुढे नेणारे दोन सत्पुरुष काही वर्षांच्या अवधीतच तिथे अवतरले आणि अवघ्या समाजासाठी परोपकार आणि सदाचरणाचा मानदंड प्रस्थापित करते झाले.

पंढरपूर नजीकच्या ‘मंगळवेढा’ येथे दामाजीपंतांच्या रूपाने ‘दानशूर’वृत्तीच्या आख्यायिका ताज्या असतानाच तेथून जवळ असलेल्या पंढरपूर तालुक्यातील करकम ‘भोसे’ या गावी शालिवाहन शके १७३७, भाद्रपद शुद्ध दशमी म्हणजेच बुधवार, १२ सप्टेंबर १८१५ रोजी आधुनिक काळातील आणखी एक ‘दामाजीपंत’ जन्म घेता झाला.

‘भोसे’ गावातील वतनदार धोंडोपंत आणि हरीबाई हे भगवद्भक्त धर्मपरायण जोडपे संतानसुखासाठी आसुसलेले होते. नियमित योग्य आचरण आणि सत्कर्मे करूनही आपल्याला अपत्यसुख लाभू नये याकरिता दुःखी असलेले हे पतीपत्नी अखेर कुलदैवत नृसिंहाचरणी शरण गेली. सात वर्षे सातत्याने, प्रसंगी अवघड असे व्रताचरण करणाऱया या उभयतांवर अखेर नृसिंहदेवतेची कृपा झाली. ‘मीच तुमच्या घरी वास्तव्यास येत आहे.’ असा देवांचा दृष्टांत झाला अन् काही दिवसांतच धोंडोपंतांना घरच्या तुळशी वृंदावनात श्रीनृसिंहदेवतेची मूर्ती सापडली. येथूनच पुढे यथावकाश हरीबाई प्रसूत झाली आणि जन्मलेल्या पुत्ररत्नाचे नाव ‘महादेव’ ठेवण्यात आले.

काळास अनुसरून महादेवचे शुभमंगल करण्यात आले. पत्नी हरिदेवी (हिराबाई) अन् महादेव आध्यात्मिक वृत्तीचे, भाविक, सत्शील आणि धर्मपरायण होते. घरी आलेल्या अतिथींचा मान राखणे, गुरुजन-साधुजनांचा उचित सन्मान करणे, साधुसंतांविषयी आदर बाळगणे आदी कर्तव्ये पार पाडणाऱया या संस्कृतीसंपन्न कुटुंबात श्रीयशवंतराव ऊर्फ साधू देवमामलेदार यांचा जन्म झाला.

महादेव आणि हरिदेवी यांना दादा, यशवंत, मनोहर, आबा, रामचंद्र, प्रल्हाद, वासुदेव, बलराम आणि सखू अशी नऊ मुले झाली. या नऊ मुलांमध्ये यशवंतराव हे दुसरे अपत्य. यशवंतरावांचा जन्म त्यांच्या आजोळी, पुणे येथे झाला. जन्मानंतर अवघ्या दोन वर्षांत हे बाळ त्याचे अलौकिक गुण प्रखरपणे दाखवू लागले. बालसुलभ चंचलता, खोडकरपणा, दंगामस्ती यांची जागा समंजस, सोशीक वृत्तीने घेतली. त्यांच्या स्वभावामध्ये प्रसन्नता होती. मुखावरील दैवी तेज त्यांच्यातील ईश्वरी भाव प्रकट करीत असे. त्यांच्या वर्तनातील परोपकारी वृत्तीचे दर्शन सर्वांस ठायीठायी अनुभवावयास येत असे. आठव्या वर्षी मुंज झाल्यानंतर यशवंतरावांनी नित्य संध्या, भगवंताची षोडशोपचार पूजा, वेदपठण यात प्रावीण्य मिळवले. दिवसांगणिक तेजःपुंज होत जाणारा त्यांचा चेहरा पाहून सर्वजण ‘हा नक्कीच कुणीतरी योगभ्रष्ट पुण्यात्मा जन्मास आला असावा’ असे सांगू लागले.

पुढे तीनच वर्षांनी यशवंतरावांचा विवाह टेंभुर्णी येथील जिवाजीराव देशपांडे यांच्या सुंदरी या सहा वर्षांच्या मुलीशी झाला. यशवंतरावांची शिक्षणातील प्रगती थक्क करणारी होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरीकरिता त्यांच्या मामाकडे, कोपरगाव येथे जाण्याचे ठरविले. मामांच्या ओळखीतील एके ठिकाणी यशवंतराव महिना १० रुपये पगारावर कारकून म्हणून रुजू झाले. सुरेख वळणदार अक्षर, नीटनेटके चोख काम यामुळे यशवंतराव तेथील अधिकारी वर्गाच्या नजरेत भरले. त्यांची योग्यता अन् गुणांची कदर करून पगारात पाच रुपयांची वाढ करीत यशवंतरावांची बदली पारनेर येथे वरच्या हुद्यावर झाली. येथे त्यांचा पाच वर्षे मुक्काम घडला. तोवर सज्ञान झालेल्या सुंदराबाईंनाही पतीच्या साथ-सोबतीसाठी पारनेर येथे पाठविण्यात आले.

यशवंतराव त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये जितके दक्ष, सतर्क व प्रामाणिक होते तितकेच ते आध्यात्मिक साधनेमध्येदेखील आग्रही होते. प्रातःकाळी नित्यनेमाने पूजा-साधना, ग्रंथपठण, वाचन-चिंतन-मनन करणे, दिवसभरात उसंत मिळेल तेव्हा सातत्याने नामस्मरण करण या कार्यात त्यांनी कधीही कुचराई केली नाही. सुंदराबाईंनादेखील अध्यात्म व देवकार्याची मनापासून आवड होती. पारनेर येथील वास्तव्य यशवंतरावांच्या प्रापंचिक तसेच पारमार्थिक आयुष्यास वेगळीच कलाटणी देते झाले. एकदा, रात्रसमयी यशवंतराव गाढ झोपेत असताना त्यांना स्वप्नदृष्टांत घडला. त्यांच्यासमोर उंचापुरा, दणकट अन् अत्यंत तेजस्वी असा महापुरुष बसला होता. भव्य कपाळ, हृदयाचा ठाव घेणारे मोठ्ठाले डोळे, भेदक नजर, भव्य छाती, सोनसळी काया, डाव्या मांडीवर उजवा पाय ओढून घेतलेला, डावा हात जमिनीवर टेकविलेला अन् उजवा हात मुडपून मांडीवर आडवा धरलेला अशा स्वरूपातील तो मनस्वी पुराणपुरुष यशवंतरावांकडे एकटक रोखून पाहात विलक्षण जरबयुक्त गंभीर आवाजात म्हणाला, ‘बेटा, घबराओ मत! मै तुम्हे कुछ देने आया हूँ। यह चीज तुम्हारे काम आएगी।’’ यशवंतरावांनी घाबरतच हात पुढे केला तेव्हा सत्पुरुषाने त्यांच्या हाती एक वस्तू ठेवली. आपल्यासोबत हे काय घडते आहे याचे आकलन होईपर्यंत तेथे तेजाचा कल्लोळ माजला आणि तो पुराणपुरुष अंतर्धान पावला.

यशवंतरावांना जाग आली. त्यांना घामाने डबडबलेल्या अवस्थेत पाहून सुंदराबाईही जाग्या झाल्या. त्यांनी कंदिलाची वात पुढे सरकवली, तेव्हा त्या लख्ख प्रकाशात यशवंतरावांना त्यांच्या हाती शाळिग्राम असल्याचे जाणवले. पळभरापूर्वी पाहिले ते स्वप्न म्हणावे की सत्य? याचा उलगडा यशवंतरावांना होईना. मात्र आजवरच्या आध्यात्मिक अनुभूतींकडे पाहता त्यांनी हा आपणांस दृष्टांत झाला असून यामागे काही निश्चित प्रयोजन असल्यामुळेच त्या दैवी सत्पुरुषाने हा शाळिग्राम दिला असावा हे मनोमनी जाणून घेत ते नित्यनेमाने शाळिग्राम पुजू लागले.

येत्या काळात, यशवंतरावांच्या आयुष्याचा कायापालट करणाऱया त्या प्रसंगाचा निर्माता कोण होता? याचा शोध घेण्यासाठी मन आतुर झालेल्या यशवंतरावांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता तो सिद्धपुरुष पुन्हा एकदा स्वप्नदृष्टांताद्वारे प्रकट झाला.. (क्रमशः)

[email protected]