दुधना धरणातून शेतीसाठी पाण्याचा बेसुमार उपसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परतूर

पाच मोठी शहरे व दहा ते पंधरा गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या दुधना धरणाच्या जलसाठ्यातून प्रचंड पाणी उपसा शेतीसाठी होत आहे. प्रशासन मात्र गाफील असल्याचे चित्र आहे. केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्यात अद्यापही इंचभर वाढ न झाल्याने आहे ते पाणी राखून ठेवण्याची गरज असतानाही प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे पिण्याचे पाणीसंकट ओढवू शकते.

परतूर, मंठा, सेलू, परभणी, मानवत व पूर्णा अशा शहराला पाणीपुरवठा करणारा निम्न दुधना प्रकल्पात सद्य:स्थितीला केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे, असे असताना या धरणातून शेतीसाठी बेसुमार उपसा सध्या अहोरात्र सुरू आहे. अशीच स्थिती राहिली तर येत्या काही दिवसांत या प्रकल्पात पिण्याच्या पाण्यासाठीही पाणी असणार नाही. पावसाळ्याचा सव्वा महिना उलटल्यानंतरही प्रकल्पात एक थेंबही आलेला नाही. अशा वेळी प्रकल्पातले पाणी राखून ठेवण्याची गरज असताना शेतीसाठी अनिर्बंध पाणी उपसा सुरू आहे. अद्यापपर्यंत तरी प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. धरणाच्या पाण्यावर परतूर व मंठा तालुक्यातील उसाच्या शेतीसाठी पाण्याचा प्रचंड उपसा केला जात आहे.

पाऊस नसल्याने एकीकडे धरणात पाण्याची आवक नाही तर दुसरीकडे प्रचंड उपसा यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत चाललेली आहे. गेल्या वर्षी धरणात या वेळी ३५ टक्के जलसाठा होता. जर पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात पिण्याचे पाणी संकट केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ओढवू शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात उसाची दुप्पट वाढ झालेली आहे. दुधना धरणातून ७ ते १० हॉर्स पॉवरच्या मोटारीने शेतकरी रात्रंदिवस पाणी उपसत असताना आता तरी नियोजन करण्याची वेळ आहे. याच धरणातून संकटकाळी जालना, घनसावंगी, सेलू तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियोजन केले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी हक्काचे पाणी असताना ते गमावण्याची वेळ येईल व त्या वेळी वेळ हातातून निघून गेलेली असेल.