वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास नुकसान भरपाई मिळणार – वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी अपंगत्व, जखमी व पशुधन मृत्यू झाल्यास भरीव आर्थिक नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार असल्याची माहिती कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.

राज्यात वाघ, बिबट्या, रानडुक्कर, गवा (बायसन), अस्वल, हत्ती, लांडगा, तरस, कोल्हा, मगर व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यांमध्ये मनुष्यहानी व पशुधन हानी झाल्यास वाढीव दराने नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केला. याबाबतची तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे. १) व्यक्ती मृत झाल्यास १० लाख रुपये, अपंग झाल्यास ५ लाख रुपये, गंभीररित्या जखमी झाल्यास १ लाख २५ हजार रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्चा करिता प्रतिव्यक्ती २० हजार रुपये. तसेच पशुधन मृत्यू, अपंग व जखमी झाल्यास पुढील प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. १) गाय, बैल व म्हैस यांचा मृत्यू झाल्यास ४० हजार रुपये मेंढी, २) बकरी व इतर पशुधन मृत्यू झाल्यास १० हजार रुपये,३) गाय म्हैस व बैल या जनावरास कायम अपंगत्व आल्यास १२ हजार रुपये, ४) गाय, म्हैस, बैल, मेंढी बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास ४ हजार प्रति जनावर याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसाह्याच्या ३ लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम ७ लाख रुपये त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यामध्ये रुपये फिक्स डिपॉझिट याप्रमाणे जमा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ, दोडामार्ग, मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यांमध्ये प्रामुख्याने हत्ती,गवारेडे व रानडुक्कर यासह अन्य वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीचे व मनुष्यहानीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. याबाबत आमदार वैभव नाईक गेली ३ वर्षे सातत्याने शासनाकडे मागणी करत होते. याबाबत वेळोवेळी विधानसभेमध्ये देखील तारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्न यांच्या माध्यमातून सभागृहात चर्चा उपस्थित करण्यात आली होती.

याच अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी व पशुधन हानी झाल्यास नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची घोषणा सभागृहात केली. यानुसार महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असुन यामुळे राज्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.