
दुर्गेश आखाडे | रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण आले असून भरतीमुळे साडे चार मीटरच्या अजस्त्र लाटा किनार्यावर धडकल्यामुळे मिर्या येथील धूपप्रतिबंधक बंधार्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे शेकडो कुटूंबं भीतीच्या छायेखाली आहेत. तसेच मोठ्या लाटांमुळे किनार्यावरचे नारळाचे तीन माड जमीनदोस्त झाले आहेत. रत्नागिरी शहरानजीक भाट्ये किनारपट्टीलाही लाटांचा तडाखा बसला आहे.भाट्ये किनाऱ्यावरील वाळू समुद्राने गिळली आहे.रत्नागिरी जिल्हयामध्ये आज समुद्रकिनाऱ्यांवर उधाण आले होते.
मिऱ्या येथील धुपप्रतिबंधक बंधार्याला ५० फूट भगदाड पडल्याने समुद्राच्या लाटा लोकवस्तीत शिरल्याने परिसरातील शेकडो कुटूंबं भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी सदर बंधाऱ्याची पहाणी केली असुन प्रशासनाने किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी उद्योजक किरण सामंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



























































