
सामना ऑनलाईन । लंडन
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’ या आजाराने ग्रस्त असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. इरफानने स्वत: ट्वीट करून याबद्दल सांगितले होते. त्यानंतरही त्याने एका मुलाखतीत उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच मायदेशी परतणार असल्याचंही म्हटलं. यामुळे त्याचे चाहतेही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. याचदरम्यान, त्याने टि्वटर अकाउंटच्या डिस्प्लेवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. यात इरफानचं वजन कमी झाल्याचं दिसत असून तरीही तो खूश असल्याचं फोटोत बघायला मिळतंय.
‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’ या आजाराशी झुंज देणाऱ्या इरफानने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्याला मायदेशी परतण्याबद्दल विचारले गेले. तेव्हा त्यानं अर्धवट उपचार न घेता पूर्ण उपचार झाल्यानंतर परतणार असल्याचं सांगितलं. त्याआधी लंडनमधील दिवस कसे चालले आहे, यावरही इरफानने एक भावनिक पोस्ट सोशल साईटवर टाकली होती. यात त्याने ”मी रुग्णालयात उपचार घेत आहे, तिथे एक बाल्कनी असल्याचं सांगितलं होतं. तसंच माझ्या बाजूलाच कोमा वॉर्ड आहे. रस्त्याच्या एका बाजूला रुग्णालय असून दुसऱ्या बाजूला लॉर्ड्स स्टेडियम आहे. जिथे माझ्या विवियन रिचर्डसचे हसरे पोस्टर आहे. जे ठिकाण माझं लहानपणीचं स्वप्न होतं, त्या ठिकाणाकडे आता जेव्हा मी बघतो तेव्हा जाणवतं की ते कधी माझं नव्हतंच.” असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली .
तसेच इरफानने त्याच्यासाठी प्राथर्ना करणाऱ्या सगळ्यांचेच मनापासून आभारही मानले आहेत. ”सगळ्यांच्या प्रार्थना मला शारीरिक बळ देत आहेत”, असं त्याने म्हटलं आहे. त्यानंतर इरफाने त्याचा सध्याच्या हा फोटो पोस्ट केला आहे.


























































