
सामना प्रतिनिधी, चाळीसगाव
चाळीसगाव येथून जवळच असलेल्या दहिवद येथील शाळेचे कुलूप पाचक्या दिवशी शुक्रवारी उघडले. मुख्याध्यापकांची झालेली बदली रद्द करावी, यासाठी ग्रामस्थांसह पालकांनी ९ जुलैपासून शाळेला कुलूप ठोकले होते. मुख्याध्यापक अहिरे यांना पुन्हा शाळेत रुजू करण्याचे आश्वासन संस्थाचालकांनी दिले.
दहिवद गावात राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेची इयत्ता पाचवी ते दहावीची शाळा आहे. यात ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक ईश्वर अहिरे यांनी शालेय पोषण आहाराचा ठेकेदार बदलवल्याने हा वाद निर्माण झाला होता. संस्थेचे संचालक धर्मा वाघ यांच्या नातेवाईकांकडून शालेय पोषण आहाराचा ठेका काढून घेण्यात येऊन गावातील कानाबाई महिला बचत गटाला ठेका देण्यात आला होता. मुख्याध्यापकांनी ठेकेदार बदलवल्याने त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली. त्यामुळे संस्थाचालकांनी दबावास बळी पडून मुख्याध्यापक अहिरे यांची मागील आठवडय़ात संस्थेच्या गणेशपूर शाखेत बदली केली होती. त्यामुळे पालक तसेच ग्रामस्थ संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी ९ जुलैपासून शाळेला कुलूप ठोकले होते.
संस्थेचे सचिव अरुण निकम, संचालक धनंजय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, धर्मा वाघ, सरपंच भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे, अशोक खलाणे, हिंमत निकम, पंकज पवार, मुख्याध्यापक अहिरे यांची बैठक शुक्रवारी पालकांसोबत झाली. मुख्याध्यापक अहिरे यांची बदली रद्द करण्याचा ठराव संस्थेच्या बैठकीत दोन दिवसांत केला जाईल. त्यानंतर ते पुन्हा शाळेवर रुजू होतील, असे आश्वासन सचिव अरुण निकम यांनी दिले. त्यामुळे पालकांनी शाळेच्या गेटला लावलेले कुलूप काढले. त्यानंतर शुक्रवारी पाचव्या दिवशी शाळेचे कामकाज नियमित सुरू झाले.































































