
सामना प्रतिनिधी, मुंबई
कधी सर्व्हर डाऊन तर कधी पाऊस… दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अकरावी प्रवेशाचा उडणारा बोजवारा यंदाही सुरूच आहे. आधी पावसाने लांबणीवर पडलेली अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता कायद्याच्या कचाटय़ात सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकरावीच्या अल्पसंख्याक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यातील जागांवर केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश देऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. तसेच या तीनही कोट्याची प्रवेशप्रक्रिया कॉलेज स्तरावरूनच पार पडणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध झालेल्या कोटय़ातील जागा पुन्हा कॉलेज व्यवस्थापनाकडे वर्ग कराव्या लागणार असून कोट्यातील आणि ऑनलाइनच्या जागांचे गणित सोडविणे शिक्षण विभागाला जड जाणार आहे.
नागपूर खंडपीठाच्या या आदेशामुळे शालेय शिक्षण विभागाला प्रत्येक अल्पसंख्याक कॉलेजनी आतापर्यंत सरेंडर केलेल्या जागा पुन्हा कॉलेज व्यवस्थापनाच्या ताब्यात द्यायच्या आहेत. हे काम चोख पार पाडणे आवश्यक असल्याने त्याला बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे आज १६ जुलैला सकाळी ११ वाजता जाहीर होणारी अकरावीची दुसरी यादी आता गुरुवारी, १९ जुलैला सकाळी ११ वाजता जाहीर होईल, असे शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी स्पष्ट केले. या यादीपासून फक्त बिगर अल्पसंख्याक कॉलेजमधील अकरावीच्या जागांवरच प्रवेश होणार आहेत. आतापर्यंत ऑनलाइन प्रवेश सुरू होण्याआधी अल्पसंख्याक कॉलेजची प्रवेशप्रक्रिया पार पडत होती. हे प्रवेश पूर्ण झाल्यावर रिक्त जागा ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात येत होत्या. यंदा ८ जुलै रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीपूर्वीच अल्पसंख्याक कॉलेजचे प्रवेश पूर्ण झाले.
याचिका कशासाठी, कुणी दाखल केली…
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्त्री शिक्षण प्रसारक मंडळासह पाच शिक्षण संस्थांनी अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांविरोधात रिट याचिका दाखल केली होती. १२ जुलैला न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि बी. पी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
न्यायालयाने बिगर अल्पसंख्याक कॉलेजची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ऑनलाइन प्रवेश पूर्ण झाल्यावर जर एखादा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिला असल्यास अशा विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक कोटय़ातील जागेवर प्रवेश देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अल्पसंख्याक कॉलेजमधील रिक्त जागा ऑनलाइनसाठी उपलब्ध झाल्यानंतर या कॉलेजमध्ये जातीनिहाय आरक्षण नसल्यामुळे या जागांवर लगेचच भरल्या जायच्या. याउलट बिगर अल्पसंख्याक कॉलेजमधील जागा जातीनिहाय आरक्षणामुळे रिक्त राहतात. मात्र आता हे प्रकार थांबणार आहेत.
तर अल्पसंख्याक कॉलेज बंद होतील
न्यायालयाचा हा निर्णय उशिराने आला आहे. प्रवेशप्रकिया सुरू होण्यापूर्वी जर ही याचिका निकाली निघाली असती तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असता. प्रवेशप्रक्रियाही खोळंबली नसती. पण या निर्णयामुळे अल्पसंख्याक कॉलेज बंद पडतील. कारण कोटा पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थी आणायचे कुठून?
– डॉ. टी. ए. शिवारे, अध्यक्ष नॉन गर्व्हन्मेंट कॉलेज प्रिसिंपल असोसिएशन
अल्पसंख्याक कोटा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनाच
यापुढे अल्पसंख्याक कोट्यातील जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यायचा आहे. बिगर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक कॉलेजमध्ये प्रवेश द्यायचा असल्यास ५० टक्के अल्पसंख्याक कोटा वगळून उर्वरित ४५ टक्के जागांवर (त्या कॉलेजला २० टक्के इनहाऊस कोटा लागू नसल्यास) किंवा २५ टक्के जागांवर (२० टक्के इनहाऊस कोटा लागू असल्यास) ऑनलाइन पद्धतीने प्रवेश द्यायचा आहे. तसेच ऑनलाइन प्रवेश पूर्ण झाल्यावरही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्यास त्यांना अल्पसंख्याक कॉलेजमध्ये रिक्त जागांवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.
दुसऱया यादीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे काही खरे नाही
दुसऱया यादीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांचे काही खरे दिसत नाही. ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण २ लाख ३ हजार १२० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५२ हजार ४९१ विद्यार्थी या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. या यादीसाठी आधी अल्पसंख्याक, इनहाऊस कोट्याच्या जागा पकडून २ लाख १२ हजार ५९३ जागा उपलब्ध होत्या; पण न्यायालयाच्या निर्णयामुळे यातील कोटय़ाच्या जागा कमी होणार आहेत. कोणत्या कॉलेजमधील किती जागा कमी होणार हे सांगता येणे सध्या तरी शक्य नाही, पण यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या कॉलेज पसंतीक्रमाप्रमाणे त्यांना प्रवेश मिळेल याची गॅरंटी नाही.
न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांवर होणार नाही
मुंबईत एकूण ८३५ कॉलेजेस असून यातील ५२१ कॉलेज ही अल्पसंख्याक आहेत.
ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी १९ जुलैला सकाळी ११ वाजता.
अल्पसंख्याक कोटय़ातील ५० टक्के इनहाऊस, २० टक्के मॅनेजमेंट, ५ टक्के कोटा प्रवेश कॉलेज स्तरावरच होणार.
न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल होणार.


























































