ग्रेटर नोएडात २ इमारती कोसळल्या ; २ ठार , ढिगाऱ्याखाली ५० जण अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | ग्रेटर नोएडा

उत्तर प्रदेशच्या पश्चिम ग्रेटर नोएडातील शाहबेरी भागातील २ इमारती मंगळवारी रात्री कोसळल्या. या दुर्घटनेत २ जण ठार झाले असून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नोएडा पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या ( एनडीआरएफ) जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. रात्री उशिरापर्यंत दोनजणांच्या मृत्यूची पुष्ठी एनडीआरएफने केली आहे. कोसळलेल्या ४ मजली इमारतीत अनेक कुटुंबे राहत होती ,तर ६ मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यामुळे मोठ्या संख्येने मजूर आणि नागरिक दोन्ही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता बचाव पथकाने व्यक्त केली. ढिगाऱ्याखाली फसलेल्या नागरिकाना शोधण्यासाठी पोलिसी श्वानांचीही मदत घेतली जात आहे.

नोएडातील या दोन्ही इमारती रात्री ९ च्या सुमारास पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळल्या. इमारतींजवळ जाणारा रास्ता अतिशय चिंचोळा असल्याने एनडीआरएफ आणि वैद्यकीय मदत पथके रात्री १ नंतर घटनास्थळी पोचू शकली. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश दिले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पोलीस महासंचालकांना मदतकार्य वेगाने करण्याचे आवाहन केले. कोसळलेली ४ मजली इमारत अतिशय जर्जर अवस्थेत होती ,तर ६ मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते अशी माहिती ही दुर्घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.