
सामना प्रतिनिधी । मुंबई
दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळण्यासाठी सुरू झालेले दूध बंद आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशी चांगलेच तापले. अनेक ठिकाणी दूध टँकर्स अडवून लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी साताऱ्यात दोघांना अटक केली आहे, तर राज्याच्या इतर भागांत १३ गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. विधानसभाध्यक्षांनी तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती, पण ती निष्फळ ठरली. १९ तारखेला आता दुसरी बैठक होणार आहे.
मुंबईकरांसाठी ट्रेनने दूध
मुंबईचा दूधपुरवठा रोखणे हे या आंदोलनाचे मुख्य अस्त्र्ा आहे. गुजरातमधून येणारे अमूल दूध मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आज दुपारी अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरला दुधाचे ४४ हजार लिटर क्षमतेचे दोन कंटेनर जोडण्यात आले आणि ही गाडी मुंबईला पाठविण्यात आली.
आजच्या दुधाचे नो टेन्शन!
शेतकऱयांनी दुधाच्या दरवाढीसाठी छेडलेल्या आंदोलनामुळे सोमवारी ठप्प झालेला मुंबईचा दूधपुरवठा आज काहीसा सुरळीत झाला. गोकुळबरोबरच अमूल, कृष्णा या दूध डेअऱयांनी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात तब्बल अकरा लाख लिटर दूध टँकरने मुंबईत आणले आहे. तर अमूलने रेल्वे वॅगनने दीड लाख लिटर आणले आहे. तसेच साडेसहा लाख लिटर दूध मध्यरात्रीपर्यंत येणार आहे. त्यामुळे उपलब्ध दुधाचा स्टॉक वाढल्याने मुंबईकरांना उद्या बुधवारच्या दुधाचे कोणतेही टेन्शन असणार नाही. मुंबईत दूध वितरण करणाऱया महानंद, अमूल, गोकूळ, वारणा, प्रभात, मदर, आरे या प्रमुख डेअऱयांकडे सोमवारी सुमारे ७५ लाख लिटर एवढा दुधाचा स्टॉक होता. त्यापैकी आज ४० लाख लिटर दुधाचे वितरण झाल्याने उद्या दुधाचा तुटवडा जाणवणार होता. मात्र मंगळवारी पहाटे गोकुळने पोलीस बंदोबस्तात २० टँकरच्या माध्यमातून तब्बल ३ लाख लिटर दूध कोल्हापुरातून आणले, तर अमूलने अडीच लाख लिटर, कृष्णा ६० हजार, इगलू मिल्क पॅकिंगकडे ५ लाख लिटर दूध आले आहे. त्यामुळे उद्याच्या दूधटंचाईचे संकट तूर्तास टळले आहे.
पावणेचार लाख लिटर दूध महाराष्ट्राच्या वेशीवर
अमूल डेअरी दररोज मुंबईत १५ लाख लिट दुधाचे वितरण करते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार अडीच लाख लिटर दूध घेऊन २० टँकर तलासरी बॉर्डरवर गुजरातच्या हद्दीत उभे आहेत. या गाडय़ा रात्री विरार, बोईसर आणि नवी मुंबईत दूध घेऊन येणार आहेत. तसेच रेल्वेच्या सौराष्ट्र एक्सप्रेसने रात्री सुमारे सव्वा लाख लिटर दूध मुंबईत येणार असल्याची माहिती अमूलच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
महानंदने तयार केले दुधाच्या भुकटीचे दूध
सर्वच दूध डेअऱयांकडे उद्याच्या वितरणासाठी पुरेसे दूध असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी दुधाच्या भुकटीचा आधार घेतला आहे. गरजेनुसार दूध भुकटी आणि बटरच्या माध्यमातून दूध बनवत आहेत. त्यानुसार पुरेसे दूध उपलब्ध असतानाही खबरदारी म्हणून महानंद डेअरीने ३० हजार लिटर दूध भुकटीपासून बनवल्याचे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम मंगळे यांनी सांगितले. तसेच जिल्हा दूध संघाकडून बुधवारी दूध आणण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
दोघांना अटक
मुंबईला येणारा दुधाचा टँकर कराड येथे अडवून फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तसेच दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
– गोकुळ, वारणा या प्रमुख दूध संघांसह कोल्हापूर जिल्हय़ातील इतर दूध संस्थांकडून दररोज संकलन होणारे सुमारे वीस लाख लिटर दूध ठप्प होते.
– उदगाव (ता. शिरोळ) येथे वारणेच्या पोलीस बंदोबस्तातील सहा टँकरवर दगडफेक.
– शिरोळ तालुक्यात तहसीलदारांच्या गाडीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला.





























































