
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील नाणार येथील केंद्र सरकारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधात शिवसेनेने काढलेल्या संघर्ष यात्रेला स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेस दहा दिवस झाले असतानाच पुन्हा एकदा राजापूर तालुका रिफायनरी हटाव…कोकण बचावच्या बुलंद घोषणांनी दुमदुमला.
रिफायनरीच्या विरोधाने पेटून उठलेल्या शिवसैनिकांसोबत शेतकरी , मच्छिमार हातात काळे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकरी आणि मच्छिमार समितीच्या वतीने केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निषेध आंदोलन डोंगर तिठा येथे करण्यात आले . यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. शेतकरी आणि मच्छिमारांबरोबर शिवसेना या निषेध मोर्चात सहभागी झाली. राजापुर तालुका संपर्क प्रमुख दिनेश जैतापकर,तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर,रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे भाई सामंत यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ,शाखाप्रमुख, सरपंच, शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी या मोर्चात उपस्थित होते.




























































