
सामना ऑनलाईन, नांदेड
सरकारी गहू तांदूळ खाजगी कंपन्यांना विकणाऱ्या एका मोठ्या टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान १ कोटी ८३ लाख ४९ हजार रुपयांचे धान्य जप्त करण्यात आले. कृष्णूर आद्योगिक वसाहतीतून शासन वितरण व्यवस्थेतील गहू आणि तांदूळ खाजगी कंपनीत नेत असताना ही कारवाई करण्यात आली.
जवाहरनगर,तुप्पा येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू आणि तांदूळ मेगा अॅग्रो अनाज कंपनी लिमिटेडला विक्रीसाठी नेण्यात येत होता. यावेळी ट्रक ताफ्याचा पाठलाग पोलिसांनी एकूण १० ट्रक पकडले. रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी मेगा अॅग्रो अनाज कंपनी लिमिटेडचे मालक अजय बाहेती,कंपनी व्यवस्थापक प्रकाश तापडीया,१० ट्रक चालक,फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे पुरवठा ठेकेदार आणि ट्रकचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


























































