
सामना प्रतिनिधी । मालवण
देवबाग गावाच्या समुद्र व खाडी किनारपट्टीवर बंधारा उभारण्यासाठी २२० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे . अशी माहिती शिवसेना जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी दिली आहे. तसेच या आराखड्याच्या मंजुरीसाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर प्रयत्न करत आहेत. असेही खोबरेकर यांनी सांगितले आहे. मालवण येथील शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत खोबरेकर बोलत होते.
तसेच यावेळी पावसामुळे बंधाऱ्यांची पडझड होऊन काही ठिकाणी समुद्राचे पाणी वस्तीत शिरल्याने अतोनात नुकसान झाले . यामुळे तातडीच्या उपाययोजनेसाठी ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुसळधार पावसामुळे देवबाग गावाच्या समुद्र व खाडी किनारपट्टीवरील बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. याचा देवबाग गावाला मोठा फटका बसला असुन गावात बंधाऱ्यांची पडझड होऊन काही ठिकाणी समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे तातडीच्या उपाययोजनेसाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात काही तांत्रिक अडचणी असून त्या महिन्याभरात पूर्ण केल्या जातील. असे खोबरेकर यांनी सांगितले. तसेच यावेळी देवबागवासीय संघर्ष समिती स्थापन करत असतील तर देवबागच्या हिताच्या दृष्टीने शिवसेना त्यांच्या सोबत राहील, असेही खोबरेकर यांनी यावेळी सांगितले.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून विजयदुर्ग ते रेडी किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ८७ मच्छीमारांना ५० टक्के अनुदानावर आऊट बोट इंजिनाचा लाभ देण्यात आला आहे. केरळच्या धर्तीवर येथील मच्छीमारांना अनुदानित इंजिन मिळावे अशी मच्छीमारांची मागणी होती. या योजनेअंतर्गत प्राथमिक टप्प्यात ८७ जणांना आऊट बोट इंजिनाचा लाभ देण्यात आला आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आऊट बोट इंजिनसह सोलर ड्रायर, खेकडा पालन, मत्स्य पालन, इन्सुलेट व्हॅन अशा मच्छीमारांच्या हिताच्या विविध योजना असून त्याचा जास्तीत जास्त लाभ मच्छीमारांनी घ्यावा असे आवाहन केसरकर यांनी केले आहे. यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते किनारपट्टीवर संपर्क अभियान राबवून मच्छीमारांना योजनेची माहिती देणार आहेत असेही खोबरेकर यांनी सांगितले.





























































