
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील कुलाबा कफ परेड येथील एसआरए योजनेत नियमांचे उल्लंघन करून निर्णय घेतल्याबाबत त्रुटी आढळल्यास प्रकल्प रद्द केला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधान परिषदेत केली.
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. साधू टी.एल. वासवानी मार्ग, कफ परेड येथील भूखंडावर ७ हजार झोपडपट्टीधारकांना पूर्वसूचना न देता येथे पुनर्वसन केले जाणार असल्याचे सांगितले. ७ हजारपैकी अडीच हजार रहिवाशांना पात्र ठरवले. यात चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा आरोप फाटक यांनी केला.
गटनेते ऍड. अनिल परब म्हणाले, सर्वसाधारण सभा न घेता पात्र-अपात्र ठरवून मनमानी कारभार केला आहे. हा प्रकल्प रद्द करणार का? यावर वायकर म्हणाले, अपात्र ठरविलेल्यांची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. या प्रकल्पात त्रुटी आढळल्यास हा प्रकल्प रद्द केला जाईल.
























































