
सामना प्रतिनिधी । नाशिक
एटीएम कार्ड पुन्हा सुरू करून देण्याचा बहाणा करीत बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती काढून घेत एका भामट्याने शेतकऱ्याला २ लाख १९ हजार ९९२ रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
आडगावच्या दिवटे वस्ती येथील शेतकरी राजाराम काशीनाथ माळोदे यांचे स्टेट बँकेत बचत खाते आहे. एका भामट्याने ५ ते ९ जुलै या काळात मोबाईलद्वारे माळोदे यांच्याशी संपर्क साधून आपण स्टेट बँकेतून बोलत असल्याचे भासविले. माळोदे यांना त्यांचे एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी सध्याच्या एटीएम कार्डची माहिती घेतली. मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरही विचारत त्यांच्या खात्यातील २ लाख १९ हजार ९९२ रुपये स्वतःच्या पेटीएम खात्यात वर्ग केले. माळोदे यांना गुरुवारी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीची फिर्याद नोंदविली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव करीत आहेत.






























































