लवकरच मैदानावर परततोय! केदार जाधवचा आत्मविश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘टीम इंडिया’चा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव झपाट्याने दुखापतीतून सावरत असून, आपण दोन-तीन आठवड्यात पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहोत, असा विश्वास स्वतः केदार जाधवने व्यक्त केला.

यंदाच्या ‘आयपीएल’ सामन्यादरम्यान मराठमोळ्या केदार जाधवची हॅमस्ट्रिंगची दुखापत बळावली होती. चेन्नई सुपरकिंग्जकडून ७ एप्रिल रोजी सलामीचा सामना खेळत असताना केदार दुखापतग्रस्त झाला होता. दुखापत झाल्यानंतर केदारने मुंबई इंडियन्सीविरूद्धचा तो सामना जिंकून दिला होता. त्यानंतर मेलबर्नमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

केदार जाधव म्हणाला, ‘माझ्या प्रकृतीमध्ये अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा होत आहे. येत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये मी नक्कीच मैदानावर पुनरागमन करेन. मला डॉक्टरांनी फलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सध्या पावासामुळे मी मैदानात उतरत नाहीये’ एका खासगी कार्यक्रमात केदार जाधवने ही माहिती दिली.

दुखापतीचा काळ खडतर!

‘सलामीच्या सामन्यानंतर दुखापतीमुळे ‘आयपीएल’चा हंगाम सोडावं लागणं, इंग्लंडसारख्या महत्त्वपूर्ण दौर्‍याला मुकणं, या सर्व गोष्टी एक खेळाडू म्हणून वेदनादायी होत्या. मात्र दुखापतीपुढे कोणताही खेळाडू काहीच करू शकत नाही. सलग तिसर्‍यांदा मला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे संघाचे फिजीओ आणि डॉक्टर यांनी मला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. हा दुखापतीचा काळ आपल्यासाठी खूप खडतर गेला.’