सरकारविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

सरकार दुष्काळाची नुकसान भरपाई देत नसल्याने उपोषणाला बसलेल्या एका शेतकऱ्याचा आंदोलन करत असताना मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील छत्तरपूर येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. मंगल यादव असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव असून सरकारी अनास्थेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप यादव यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

छत्तरपूर जिल्हग्यातील डुमरा गावातील शेतकऱ्यांना १४ जुलै रोजी ग्राम पंचायतीत दुष्काळाची नुकसान भरपाई देणार होती. मात्र संपूर्ण दिवस ग्राम पंचायतीच्या आवारात वाट पाहून देखील शेतकऱ्यांना काहीच देण्यात आले नाही. याबाबत विचारणा केली असता नुकसान भरपाईचे वाटप काही दिवसांनी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी ग्राम पंचायतीच्या आवारातच उपोषणाला सुरुवात केली. शेतकरी उपोषणाला बसलेले असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. मंगळवारी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांपैकी मंगल यादव या ६५ वर्षीय शेतकऱ्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी तेथील डॉक्टरांनी त्यांना ग्वाल्हेर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र यादव यांचा मुलगा जगदीश याच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने तो वडीलांना घरी घेऊन आला. त्यानंतर दरम्यान मंगल यादव यांचा मृत्यू झाला. मंगल यादव यांचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ग्राम पंचायती जवळ रस्ता रोको आंदोलन केले. मात्र इतके करुनही एकही प्रशासकीय अधिकारी व नेता शेतकऱ्यांना तसेच मंगल यादव यांच्या कुटुंबीयांना भेटायला आला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.