
सामना ऑनालाईन, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ – परभणी मार्गावर असलेल्या वसमत तालुक्यातील आडगाव नजीक भरधाव वेगातील टेम्पोचा पुढील टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड व परभणी येथे उपचार सुरू आहेत. हट्टा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आडगाव जवळ औंढा- परभणी मार्गावरुन आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आयशर टेम्पो जात होता. या टेम्पोमधून जवळाबाजार येथील आठवडी बाजारासाठी परभणी येथून भाजीपाला नेण्यात येत होता. यावेळी आडगाव नजीक टेम्पो भरधाव वेगात असताना गाडीचे पुढील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात टेम्पोत बसलेले शेख समीर शेख मोईन व शेख इरफान शेख अल्लाबक्ष या दोघांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांवर नांदेडमध्ये तर इतरांवर परभणीमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.






















































